मुंबई - कारगिल युद्धाला वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत अथर्व फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने शुक्रवारी षण्मुखानंद हॉलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवानांचे हे श्रम कधी वाया जाऊ देणार नाही असे यावेळी कार्यक्रमात बोलताना माजी सैनिकांनी सांगितले.
शुक्रवारी षण्मुखानंद हॉलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात निवृत्त सैनिक, अनेक सैनिकांचे कुटुंब, वीरमरण आलेल्या सैनिकांचे कुटुंब व आता सेवा करणाऱ्या सैनिकांचे देखील कुटुंब उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. सोबतच देशाच्या सीमेवर असणाऱया जवानांमुळे, कारगिलमध्ये अनेक जवानांनी प्राण गमावले म्हणूनच आपण आज सुरक्षित आहोत असे भाव व्यक्त केले. पुढे बोलताना, भारताने कधी कुणावर हल्ला नाही केला पण जर कुणी आम्हाला कमजोर समजून आमच्यावर हल्ला केला असेल तर त्यांना आपल्या जवानांनी जशास तसे उत्तर प्रत्येक वेळी दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देशासाठी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आधी पाच लाख रुपये मिळत होते. मात्र, आता त्यांना १ कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच, त्यांच्या पत्नींना 2 एकर जमीन दिली जाते, याची सुरुवात मागील दोन वर्षांपासून झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
15 अॉगस्ट आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला हुतात्मा जवानांच्या नातेवाईकांना आम्ही सन्मानपूर्वक बोलावतो. भारताने नेहमीच त्याग आणि वीरतेची पूजा केली आहे. आमचा वीर सैनिक मोठा त्यागही करतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.