मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन कोटींचे नुकसान भरपाईची मागणी कंगनाने याचिकेत केली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली.
शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आल्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये कंगना राणौतच्या वकिलांकडून संजय राऊत यांच्या संदर्भातली ऑडिओ क्लिप सादर करण्यात आली होती. माझ्या विरोधात केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली असून 'संजय राऊत यांनी उखाड देंगे, उखाड दिया' अशा शब्दांचा प्रयोग करून मला धमकावण्याचा प्रयत्न केला होता, असे कंगनाने याचिकेत म्हटलं होते.
कंगनाच्या या आरोपावर मुंबई उच्च न्यायालयाने सदरची संजय राऊत यांची ऑडिओ क्लिप चालवण्यास सांगितले. त्यावर संजय राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांनी आक्षेप घेतला. ऑडिओ क्लिपमध्ये कंगना राणौतच्या नावाचा उल्लेख नाही, असे प्रदीप थोरात यांनी म्हटलं. तसेच मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करू, असं आश्वासनही प्रदीप थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयामध्ये करण्यात आलेल्या बांधकामासाठी तिला 8 सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या एच वेस्ट वॉर्डकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्याच दिवशी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याला सुद्धा अशाच प्रकारच्या बांधकामावरून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या नोटिसीला उत्तर देण्यासाठी कंगना राणावत हिला 24 तासांची मुदत देण्यात आली होती. तर मनिष मल्होत्रा याला सात दिवसांचा अवधी मुंबई महानगरपालिकेने दिला होता. यामुळे कंगना राणावत वर झालेली महापालिकेची कारवाई ही सूडबुद्धीने केली असल्याचा दावा तिने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.