मुंबई - विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची राज्यपालाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. आज संध्याकाळी त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, विधानमंडळ सचिव ( कार्यभार) राजेंद्र भागवत ,विधी व न्याय प्रधान सचिव आर. एन लढ्ढा उपस्थित होते.कोळंबकर हे विधानसभेतल्या ज्येष्ठ आमदारांपैकी एक आहेत.
हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत इतर ज्येष्ठ सदस्यांची नावे चर्चेत होती. त्यात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्या नावांचा समावेश होता. त्यात कोळंबकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस
कालिदास कोळंबकर हे सध्या वडाळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. एकेकाळी नारायण राणेंचे निष्ठावंत समजले जाणारे कोळंबकर सध्या देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
कालिदास कोळंबकर हे सुरुवातील शिवसेनेत होते. शिवसेनेतून ते पाचवेळा विधानसभेत निवडून आले. नारायण राणेंच्या बंडानंतर ते राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडले. राणे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तेही काँग्रेसमध्ये गेले. पुढे राणेंनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण, कोळंबकरांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंद केले. त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची जवळीक वाढत गेली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारकीची ही त्यांची आठवी खेप आहे.