मुंबई - महान स्वातंत्र्य सेनानी राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंह व राजेंद्र लाहिरी यांना आजच्याच दिवशी (19 डिसेंबर) 1927 ला इंग्रज सरकारने फाशी दिली होती. आजचा दिवस 'बलिदान दिवस' म्हणून ओळखला जातो. या तीन क्रांतिवीरांनी 'काकोरी कट' घडवून आणला आणि इंग्रजांना इशारा दिला होता. काकोरीच्या खटल्यामध्ये चार जणांनी देशासाठी बलिदान दिले.
काकोरी कट -
9 ऑगस्ट 1925 च्या रात्री चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंह यांच्यासहित इतर साथीदार रात्री साडेसात वाजता लखनौपासून काही अंतरावर असलेल्या काकोरी रेल्वेस्थानकाच्या दिशने गेले. काकोरी आणि आलमनगर स्थानकादरम्यान असलेल्या 'सहारनपूर-लखनौ एक्सप्रेस' या रेल्वेवर गनिमा कावा तंत्राने इंग्रजांचा सोने, चांदी आणि नाण्यांनी भरलेला खजिना लुटला. दहा क्रांतीकारक विरुध्द रेल्वेचे सुरक्षा रक्षक असा हा सामना झाला. काकोरी कट म्हणून ही घटना ओळखली जाते. या मोहिमेतून चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या तावडीतून सुटून गेले. परंतु, अशफाक उल्ला खान, रोशन सिंह आणि राम प्रसाद बिस्मिल यांना इंग्रज सरकारने फाशी सुनावली. त्याआगोदरच्या काळात काकोरीच्या घटनेनंतर अशफाक उल्ला खान यांनी आपले नाव बदलले. 'कुमारजी' या नावाने त्यांनी क्रांतीचा यज्ञ पुढील काही काळ धगधगता ठेवला. मात्र, या गोष्टीची इंग्रजांना कुणकुण लागताच त्यांनी योजना आखून अशफाक यांना अटक केली.
अशफाक उल्ला खान एक धगधगती ज्वाळा -
22 आक्टोबर 1900 ला उत्तरप्रदेशमधील शहीदगड या गावी अशफाक उल्ला खान यांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव मोहम्मद शफीक उल्ला खान तर आईचे नाव मजहूरुनिशा बेगम असे होते. अशफाकचं बालपणी अभ्यासात मन रमत नव्हतं तर त्यांना घोडेस्वारी, नेमबाजी यात आवड होती. अशफाकला लहानपणासूनच कविता लिहिण्याचा छंद होता.
राष्ट्रपिता महात्मा गांधींचा प्रभाव -
कस ली है कमर अब तो, कुछ करके दिखाएंगे,
आज़ाद ही हो लेंगे, या सर ही कटा देंगे।
हटने के नहीं पीछे, डरकर कभी जुल्मों से,
तुम हाथ उठाओगे, हम पैर बढ़ा देंगे।
बेशस्त्र नहीं हैं हम, बल है हमें चरख़े का,
चरख़े से ज़मीं को हम, ता चर्ख़ गुंजा देंगे।
अशफाक उल्ला खान हे शेवटच्या टप्प्यात जहाल विचारवादी असले तरी त्यांच्यावर महात्मा गांधीचा पहिल्यापासूनच प्रभाव होता. मात्र, गांधींनी चौरी-चौरा हिंसेच्या घटनेनंतर 'असहकार चळवळ' मागे घेतली. त्यानंतर अशफाक खूप नाराज झाले होते.
अशफाक आणि रामप्रसाद यांची दोस्ती -
![Ashfaqullah Khan & Ram prasad bismil](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5420644_ram.jpg)
अशफाकचा मित्र बिस्मील हा शाहजहानपूरमध्ये आर्य समाज संस्थेमध्ये सक्रिय होता. अशफाकही त्यासोबत जाऊन राहू लागला. रामप्रसाद बिस्मिल यांनी अशफाकला धन्यवाद देत आपल्या मैत्री स्पष्ट केली. रामप्रसाद म्हणतात, "अशफाक! ईश्वर तुम्हारी आत्मा को शांती दे। तुमने मेरी और देश के सभी मुसलमानों की लाज बचा ली है। यह दिखा दिया है की भारत में भी तुर्की और मिस्त्र जैसे मुसलमान युवक मिल सकते हैं।" त्यानंतर रामप्रसाद आपल्या पत्रात म्हणतात, "देशवासियांना आमची एकच प्रार्थना आहे की त्यांनी आमच्या फाशीनंतर हिंदू-मुस्लीम एकता प्रस्थापित करा. हीच आमची शेवटची इच्छा आहे." 1928 ला भगतसिंगाने 'किरती' या पुस्तकात विद्रोही नावाने लेख लिहीला त्यामध्ये हे पत्र छापले होते.
अशफाक एक विद्रोही कवी -
काकोरी कटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या अशफाक यांना कविता लिहिण्याचा फार छंद होता. त्यांच्या कवितेने देशातील युवकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा व ताकद मिळत होती. बिस्मिल आणि अशफाक स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक बनले होते. आजही त्यांच्या मैत्रीचा आणि विचारांचा आधार धर्माच्या सलोख्याची व धर्मनिरपेक्षतेची प्रेरणा देतात. अशफाक यांनी 'हसरत' या नावाने उर्दू शायरी लिहिल्या आहेत.
जाऊंगा खाली हाथ मगर, यह दर्द साथ ही जायेगा
जाने किस दिन हिन्दोस्थान. आजाद वतन कहलायेगा
अशफाक यांनी देशवासियांसाठी लिहीलेलं शेवटचं पत्र -
बलिदान देण्याच्या 3 दिवसांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 1927 ला फैजाबादच्या कारागृहातून अशफाक यांनी देशवासियांसाठी तीनशे शब्दांमध्ये पत्र लिहिले होते. "भारतमातेच्या रंगमंचावर आम्ही आमची भूमिका पार पाडली आहे. चुकीचं केलं बरोबर केलं या भानगडीत आम्हाला आता पडायचं नाही. जे काही केलं ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं. आपल्याच साथींनी (काँग्रेस मित्र) आमची निंदा केली. मात्र, आपल्या दुश्मनांना आमच्या हिंमतीची आणि वीरतेची स्तुती करावी लागली. लोकांनी आम्हाला दहशती म्हणून निंदा केली. मात्र, मी व माझ्या साथींनी असं काहीही केलेलं नाही. उलट आमच्यावर इतका काळ खटला चालू राहिला. माझे बरेच साथी बाहेर फिरत होते. (चंद्रशेखर आझाद) त्यांनी ठरवलं असत तर इंग्रजावर गोळ्या झाडल्या असत्या. मात्र, आमचं नुकसान करणे कुणाला त्रास देणं ध्येय नसून फक्त स्वातंत्र्यासाठी लढत आहोत."
पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात अशफाक म्हणतात, "हिंदुस्तानी भाइयो! आप चाहे किसी भी धर्म या सांप्रदाय को मानने वाले हों, देश के काम में साथ दो! व्यर्थ आपस में न लडो। रास्ता चाहे अलग हों, लेकीन उद्देश्य सबका एक है। सभी कार्य एक ही उद्देश्य की पूर्ती के साधन है। फिर यह व्यर्थ के लडाई-झगडे क्याो? एक होकर देश की नौकरशाही का मुकाबला करो अपने देश को आजाद कराओ। देश के सात करोड मुसलमानों में मैं पहला मुसलमान हूँ, जो देश की आजादी के लिए फाँसा चढ रहा हूँ, यह सोचकर मुझे गर्व महसून होता है। अंत में सभी को मेरा सलाम! हिंदुस्तान आजाद हो! मेरे भाई खुश रहे! आपका भाई अशफाक"
आजच्या दिवशी 1927 साली क्रांतिकारक अशफाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मल, रोशन सिंह व राजेंद्र लाहिरी देशासाठी हुतात्मा झाले. भारताच्या या महान सुपुत्रांना विनम्र अभिवादन!