मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान जे पी नड्डा यांनी संघटना वाढीसाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. मात्र या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत औपचारिक कार्यक्रमांना उपस्थिती लावण्या व्यतिरिक्त, जेपी नड्डा यांनी भाजपचे महासचिव विनोद तावडे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाच अधिक पाठबळ दिल्याचे दिसून आले.
उपनगरातच का फिरले नड्डा?: भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मुंबई दौरा हा आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र या दौऱ्या दरम्यान जे पी नड्डा बोरीवलीत तावडे यांच्या आमदारकीच्या काळात बांधण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाला भेट दिली. तर जे पी नड्डा यांनी तावडे यांच्या घरी स्नेह संमेलनासाठी भेट दिली, तर मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कायम सोबत घेत त्यांनी मुंबईकरांच्या भावना जाणून घेतल्या. त्यामुळे जे पी नड्डा किंवा भारतीय जनता पक्ष मुंबईत पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार का? अशी चर्चा आता सुरू झाल्याची प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
जे पी नड्डा किंवा भारतीय जनता पक्ष मुंबईत पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार का? अशी चर्चा - जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी
मुंबईतील अनेक मतदारसंघांवर मराठी मतांचा प्रभाव?: मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने विचार करता मुंबईमध्ये अजूनही 70 टक्के मतदारसंघांवर मराठी मतांचा प्रभाव आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष हे भाई जगताप मराठा समाजाचे आहेत. शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांमध्ये कोकणातील मराठा समाजातील अनेक नेते कार्यरत आहेत. तर त्यामुळे भाजपनेही आपला मुंबईसाठीचा चेहरा हा आशिष शेलार यांच्या रूपाने मराठांना दिलेला आहे. तर आता मुंबई उपनगरातील महत्त्वाच्या असलेल्या बोरिवली मतदार संघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी विनोद तावडे यांचे उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्या दृष्टीनेच विनोद तावडे यांना गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जात असल्याची प्रतिक्रिया, जोशी यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने मुंबईत पक्षाला अधिक बळकटी आणण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मराठा कार्ड खेळण्याचे ठरवल्याचे दिसते. मुंबईत सध्या भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना केंद्राकडून पाठबळ मिळताना दिसत आहे. - जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी
तावडे यांना महत्त्व देण्याची कारणे?: विनोद तावडे हे मुंबईतील मराठा चेहरा आहेत. तसेच तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून काम केले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या प्रवक्ते पदाच्या जबाबदारी सोबतच मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच ते शिक्षण मंत्री म्हणून काम देखील केले आहे. तर तावडेंच्या उमेदवारीसाठी यापूर्वी पक्षाने हेमेद्र मेहता यांची उमेदवारी कापली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्या नंतर तावडे यांना केंद्रात महासचिव म्हणून महत्त्वाच्या पदी नेमण्यात आले होते.
आशिष शेलार यांची वैशिष्ट्ये: ॲडव्होकेट आशिष शेलार हे कोकणातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मराठा समाजातील नेते आहेत. त्याचा सर्व धर्मीयांमध्ये दांडगा संपर्क आहे. मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. तसचे मुंबई महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत पक्षाला ८२ जागा जिंकून दिल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील पक्ष बांधणी मध्ये शेलार यांचा मोठा वाटा आहे. आशिष शेलार यांच्याकडे शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती. मुंबई अध्यक्ष पदाची शेलार यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस अडचणीत: भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांचे तिकीट कापून, त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. मात्र त्याच विनोद तावडे यांना आता केंद्रीय नेतृत्वाकडून बळ मिळत आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी विनोद तावडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. तावडे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास फडणवीस यांच्या जवळचे मांडल्या जाणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा पत्ता कट होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि विनोद तावडे हे दोन्ही फडणवीस विरोधी नेते अमित शाह यांच्या जवळ असल्याची चर्चा आहे. मराठा समाजातील हे दोन्ही नेते एकत्र आल्यास आगामी काळ फडणवीसांसाठी अडचणीचा ठरण्याची चर्चा सुरू असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा -