मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात विवादास्पद टिप्पणी करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पायधुनी पोलिसांकडून चौकशी कामी समन्स बजावण्यात आले आहे. याविरोधात तातडीची याचिका अर्णब गोस्वामी यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणीदरम्यान कुठलाही दिलासा अर्णब गोस्वामी यांना देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या तर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला होता. ज्यात म्हणण्यात आले होते की, पायधुनी पोलीस ठाणे हे कंटेनमेंट परिसरामध्ये येत असून एकाच प्रकरणात अनेक गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे याबाबत स्पष्ट आदेश असल्यामुळे याबद्दल न्यायालयाने हस्तक्षेप करावा, म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती.
यावर सरकारी वकिलातर्फे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, अर्णब गोस्वामी हे पायधुनी पोलीस ठाणे हे कंटेनमेंट परिसरामध्ये येत असल्याचा दावा करत असले तरी, ते एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशी कामी हजर राहू शकतात. देशात व्यक्तीपेक्षा कायदा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे यामध्ये कुठलाही दिलासा पत्रकार गोस्वामी यांना दिला जाऊ नये, असा दावा कपिल सिब्बल यांच्या तर्फे करण्यात आला.
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती उज्जल भुयान व न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना 10 जून रोजी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच 12 जूनला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.