मुंबई - दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत खुद्द अन्न, नागरी पुरवठा विभागाचे मंत्री यांना मंत्रिमंडळ प्रस्तावाबाबत अंधारात ठेऊन कॅबिनेटमध्ये सचिवांनी स्वतः प्रस्ताव मांडल्याचा प्रकार घडला. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मंत्र्यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत कर्तव्य पार पाडताना शासकीय कामकाजात होणाऱ्या विलंबास जबाबदार असलेल्या अन्न, नागरी पुरवठा विभागात सहसचिव पदावर काम करणाऱ्या सतीश सुपे यांची अखेर उचलबांगडी करून त्यांची वित्त विभागात बदली करण्यात आली आहे.
गेल्या ७ ते ८ वर्षांपासून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात सहसचिव म्हणून सतीश सुपे कामकाज पाहत होते. अनेक वर्ष एका खात्यात असल्याने त्यांच्याकडे या खात्याच्या कामकाजाबाबत इत्यंभूत माहिती असल्याने आपला मनमानी कारभार करण्याचे प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत देखील त्यांनी अन्न, नागरी पुरवठा विभागाबाबत अनेक शासन निर्णय मंत्र्यांना माहिती न देता व त्यांची परवानगी न घेता परस्पर काढले. आता तर गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळात अतिशय जेष्ट असलेल्या मंत्र्यांची परवानगी न घेताच त्यांच्या खात्याचा प्रस्ताव मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडण्याचा प्रकार झाला.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या सचिव पदावर सचिव म्हणून संजय खंदारे हे कामकाज बघत आहेत. या विभागाचा कार्यभार घेऊन सहा महिने झाले. मात्र, संजय खंदारे यांना या विभागातील कामाचा उरक आलेला नाही. फक्त करायचं म्हणून करायचं अशीच त्यांची भावना असल्याने या विभागाचे पुर्वी प्रधान सचिव असलेल्या महेश पाठक यांना लॉकडाउनच्या काळात अन्नधान्य वितरणामध्ये लक्ष घालावे लागले होते. किंबहुना खंदारे हे नवीन असल्याने त्यांना निर्णय घेतांना त्यांच्या विभागात जेष्ट असलेल्या सहसचिवांनी नियमांची कल्पना देणे आवश्यक होते. मात्र सुपे यांनी याबाबत सचिवांना अवगत न केल्याने आणि सचिवांनी सुद्धा गांभीर्याने न घेतल्याने मंत्री मंडळाच्या बैठकीत पहिल्यांदाच असा प्रकार घडून आला.
या घटनेनंतर राज्य शासनाच्या वतीने गेल्या ७ ते ८ वर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या तसेच मनमानी कारभार करून कर्तव्य पार पडतांना शासकीय कामकाजातील अनियमिततेस जबाबदार असलेल्या सहसचिव सतीश सुपे यांची अखेर उचलबांगडी केली आहे.