मुंबई - तिवरे धरण फुटल्याच्या प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री विनोद तावडेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. धरण फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विनोद तावडेंनी बोरिवलीत एका उद्यानाचे उद्धाटन केले. त्यावरुन आव्हाड यांनी 'तिकडे लोक स्मशानात आणि तुम्ही उद्यानात' असे म्हणत तावडेंना लक्ष केले.
विनोद तावडेंनी याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी असेही आव्हाड म्हणाले. २३ माणसे वाहून गेली असता तुम्ही उद्यानाचे उद्धाटन करत होता. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या आणि स्वत: ला कोकण पुत्र म्हणवणाऱ्या विनोद तावडेंनी असंवेदनशीलता दाखवली असल्याचेही आव्हाड म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची गुर्मी आली आहे. लोक सत्ता जशी देतात तशी आपली खुर्चीही उलटी करु शकतात. लोकमनाचा आदर न करता लोकांच्या भावना दुखावने ही सत्ताधाऱ्यांची दिनचर्या झाल्याचे आव्हाड म्हणाले. तुम्ही त्यांच्या दुखा:चाही विनोद करता, ते तिथे स्मशानात असतात आणि तुम्ही उद्यानात नाचत असता असे म्हणत आव्हाडांनी सत्ताधाऱ्यावर चांगलाच निशाणा साधला.