मुंबई - 'चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे. इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
#LetterToAmbedkar मोहीम -
महाविकास आघाडी रंजल्या-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करणार आहे. कितीही हल्ले झाले तरी समता, न्याय, बंधुता या मुल्यांचे रक्षण करेल, असे जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्याच अनुषंगाने आंबेडकरी अनुयायांतर्फे #LetterToAmbedkar ही मोहीम राबवली जात आहे. यात प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून अभिवादन केले जाणार होते. स्वतः जयंत पाटील यांनी पत्र लिहून या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
काय आहे जयंत पाटील यांच्या पत्रात?
'प्रिय बाबासाहेब, देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम करण्याचे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा जाऊ न देता समता, न्याय, बंधुता या मुल्यांचं आम्ही रक्षण करू', असे आश्वासन जयंत पाटील यांनी पत्राद्वारे दिले आहे.
मान्यवरांनी केले बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर मंत्री यांनी सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असे आवाहन यावेळी सर्वांनी केले.