मुंबई - ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरुमध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी स्ट्राँगरूममध्ये जाण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे त्यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे.
महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यामध्ये यशस्वी नियोजन व अंमलबजावणीबद्दल निवडणूक आयोगाचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले आहे. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना सीलबंद मशीन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये थेट आतमध्ये जाण्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाबाबत आमचा आक्षेप असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत.
मुळात सीलबंद मशिन्सजवळ उमेदवाराला जाण्याचे कारण नसते. ईव्हीएम मशीनमधील डेटामध्ये दुरुस्ती करून मतदान प्रक्रियेत बदल केला जावू शकतो, याची दाट शक्यता आहे. याबाबत विरोधी पक्षांनी सबळ पुरावे सादर केले आहेत. शिवाय विरोधी पक्षांनी आपले आक्षेपही वेळोवेळी नोंदवले आहेत. त्यामुळे यावर तातडीने पुनर्विचार करुन उमेदवारांना स्ट्राँगरुमध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
मतदान पश्चात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होऊन भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या कायद्यामध्ये अधिक्षेप होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये रिमोट पध्दतीने अनेक बदल घडविता येतात. हे प्रगत तंत्रज्ञानाने सिद्ध करुन दाखवले आहे. त्यामुळे याबाबत आपण विषाची परीक्षा घेवू नये. कुठल्याही आशंकेला जागा राहिल आणि लोकांचा लोकशाही पद्धतीवरील विश्वास उडेल, अशा पद्धतीचे कोणतेही निमित्त निर्माण होवू नये. त्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
एकाच पूर्वनिश्चित वेळी त्या त्या विभागातील सर्व उमेदवारांना बोलवून त्यांची योग्य पद्धतीने कसून तपासणी करावी. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दुरनियंत्रित उपकरण नाही ना, याची खातरजमा करून मगच या स्ट्राँगरुमध्ये परिनिरीक्षणार्थ प्रवेश द्यावा, अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.