मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आमची आणि देशातील मित्रपक्षांची इच्छा आहे. आम्ही आठ दिवसांपूर्वी त्यांना तशी विनंती केली होती. पवार हे मोदी सरकारच्या विरोधात देशातील सर्व नेत्यांना एकत्र करत आहेत. ते लोकसभेत आले तर हेच काम आणखी वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिली आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये यासंदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इत्यादी नेते उपस्थित आहेत.
याबाबात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, की राज्यात सेना -भाजपच्या विरोधात असलेले सर्व पक्ष आमच्यासोबत येत आहेत. मात्र, मनसेसोबत आमची कसलीही चर्चा झाली नाही. आता आमची सर्व पक्षांसोबत बोलणी करण्याची प्रक्रिया संपूर्ण झाली आहे. आता जागा वाटपाचा विषय असून तो येत्या चार-पाच दिवसात सुटेल. काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये केवळ 3 जागांचा प्रश्न पडला असला तरी तोही चर्चेने सोडवला जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.