ETV Bharat / state

जयंत नारळीकरांची 'व्हायरस' कादंबरी आता 'स्टोरीटेल'वर ऐकण्याची पर्वणी - जयंत नारळीकरांची 'व्हायरस' कादंबरी 'स्टोरीटेल'वर

'स्टोरीटेल'ने अनेक कलाकारांच्या आवाजात निरनिराळ्या विषयांवरील कथा रसिकांना ऐकवल्या आहेत. आता साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. जयंत नारळीकर लिखित कादंबरी 'व्हायरस'ही ऐकायला मिळणार आहे. आवाजाच्या दुनियेतील जादूगार व्हॉईस आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या खणखणीत आवाजात साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी ही कादंबरी स्टोरीटेल मराठीच्या 'ऑडिओबुक'मध्ये ऐकणं आता पर्वणी ठरणार आहे.

jayant
jayant
author img

By

Published : Jul 2, 2021, 9:19 PM IST

मुंबई - कथाकथन ही एक कला आहे. उत्तम कथा ऐकणाऱ्याला बांधून ठेऊ शकते. याच पद्धतीचा अवलंब करत 'स्टोरीटेल'ने अनेक कलाकारांच्या आवाजात निरनिराळ्या विषयांवरील कथा रसिकांना ऐकवल्या आहेत. स्टोरीटेलने आता अनेक भारतीय प्रादेशिक भाषातूनही 'ऑडिओबुक' काढले आहेत. त्यात मराठी कथांचाही समावेश आहे. त्यातीलच पुढचे पान म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. जयंत नारळीकर लिखित कादंबरी 'व्हायरस'.

'व्हायरस' श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी कादंबरी

आवाजाच्या दुनियेतील जादूगार व्हॉईस आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या खणखणीत आवाजात साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी ही कादंबरी स्टोरीटेल मराठीच्या 'ऑडिओबुक'मध्ये ऐकणं आता पर्वणी ठरणार आहे. प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृध्द केले आहे. २०१५ सालच्या 'साहित्य अकादमी पुरस्काराने' सन्मानित 'व्हायरस' ही सायन्स फिक्शन कादंबरी आता 'स्टोरीटेल मराठीच्या' लोकप्रिय 'ऑडिओबुक' मध्ये उपलब्ध झाली आहे.

व्हायरसचे आशयसूत्र आणि उपसूत्र

'व्हायरस' या कादंबरीत समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेल्या संकटात उद्भवणार्‍या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शवला गेला आहे. 'व्हायरस' स्टोरीटेल मराठीच्या 'ऑडिओबुक'मध्ये ऐकत असताना अप्रत्यक्षरित्या डोळ्यांसमोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते. १९९६ मध्ये प्रकाशित झालेली 'व्हायरस' ही कादंबरी नारळीकरांची चौथी कादंबरी. वसाहतवादी प्रेरणांनी संगणकप्रणालीत विषाणू सोडून परग्रहावरील सजीवांनी केलेले छुपे आक्रमण, पृथ्वीवासियांनी त्याचा लावलेला छडा आणि केलेला प्रतिबंध हे 'व्हायरस'चे मुख्य आशयसूत्र आहे. निरनिराळ्या राष्ट्रातील जीवन विस्कळीत होऊ लागते. यामागे राष्ट्रीय कारवाया आहेत. याचा छडा लावण्याचा प्रयत्न निनिराळ्या राष्ट्रातील शास्त्रज्ञ, लष्करी तज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणा घेत असतात, हे 'व्हायरस'चे उपसूत्र आहे.

हॉलिवूडच्या 'इंडिपेन्डन्स डे' चित्रपटाची आठवण करुण देणारा भास

'व्हायरस' कादंबरी 'स्टोरीटेल मराठीच्या' लोकप्रिय 'ऑडिओबुक'मध्ये ऐकताना श्रोत्यांना हॉलिवूडच्या 'इंडिपेन्डन्स डे' चित्रपटाची आठवण करून देणारी गोष्ट आपण ऐकत असल्याचा भास होत राहतो. पृथ्वीपासून सहा प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापर्यंतच्या असीम स्थलावकाशात साडेसहा वर्षांच्या काळात घडलेल्या घटनांची कथा म्हणजे 'व्हायरस' होय. बुध्दिमान वैज्ञानिकांचे अंतर्गत व्यवहारविश्व आणि त्यांच्याभोवतीची प्रशासनयंत्रणा यांचे चित्रण हे 'व्हायरस'चे अजून एक उपसूत्र आहे. अशा प्रकारे मध्यवर्ती आशयसूत्राला परिपुष्ट करणाऱ्या पूरक आणि पोषक उपसूत्रांनी 'व्हायरस' भरीव होते.

'व्हायरस' मधील थरार आणि रहस्य जाणून घेण्यासाठी, तसेच आलेल्या संकटावर वैज्ञानिक मिळून कशी मात करतात? हे प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात "व्हायरस" मधून समजणार आहे. 'स्टोरीटेल'द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे. त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यांचा अमाप प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा भिंत पालिका लवकरच पाडणार?

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.