मुंबई - दाऊदचा हस्तक इकबाल मिर्ची व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारप्रकरणी ईडीने इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायून मर्चंटला मंगळवारी अटक केली. मुंबईतील वरळी परिसरातील सिजे इमारतीच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी 12 तास चौकशी केली होती.
यासंदर्भात हुमायून मर्चंटला अटक करण्यात आलेली आहे. हुमायून मर्चंटकडे इकबाल मिर्चीची पॉवर ऑफ अॅटर्नी असल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वरळीतील सिजे इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकरणामध्ये प्रफुल पटेल यांनी हुमायून मर्चंट याची भेट घेतल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - नाराजी असतानाही महायुतीचा प्रचार केला, त्यामुळे आम्हाला सरकारमध्ये धोका नाही'
हुमायून मर्चंटच्या अटकेमुळे प्रफुल पटेलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वरळीतील सिजे इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी मिलेनियम डेव्हलपर म्हणून कंपनीची स्थापना करण्यात आली होती. यात भागीदार म्हणून प्रफुल पटेल व त्यांची पत्नी वर्षा पटेल या दोघांचेही समभाग असल्याचे दाखवण्यात आले होते. इमारतीमध्ये इकबाल मिर्चीची पत्नी हजरा मिर्चीच्या नावावर काही सदनिका असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.