मुंबई : माटुंगा पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार अनिल शिरसागर (वय 60) दादर येथे राहतात. कोवीडमुळे नोकरी गेल्याने ते नोकरीच्या शोधात होते. त्यानुसार त्यांनी ऑनलाईन नोकरी डॉट कॉमवर त्यांनी रिझ्युम अपलोड केलेला होता. त्यानुसार त्यांना मोबाईल क्र. 7318241342, 7390935795 आणि 7897278126 वरून फोन आले. त्यांनी फिर्यादी यांना संपर्क करून त्यांचे रिझ्युम बघितल्याचे सांगून आरोपीतांनी फिर्यादी यांना मेल पाठवून त्यांचे दुबईमधील पेट्रोफे इंटरनॅशनल या कंपनीत सिलेक्शन झाल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार रुपये आरोपींनी खात्यावर मागवून घेतले.
माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार : त्यानंतर देखील पैशाची मागणी चालूच असल्याने फिर्यादी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून पैसे परत मागितले असता ते देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागले. त्यांनंतर आरोपींचे सर्व मोबाईल क्रमांक फिर्यादीला बंद आढळून आले. त्यामुळे फिर्यादी यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माटुंगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० ब ३४ भा.द. वि. सह कलम ६६ क ६६ ड अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपींना न्यायालयाकडून पोलीस कोठडी : त्यानंतर माटुंगा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. त्यांची पथके उत्तर प्रदेश, दिल्ली लखनऊ येथे रवाना केली. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून 13 फेब्रुवारीला सुरजपुर पोलीस ठाण्याच्या मदतीने पहिल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून रिषभ मनीष दुबे (वय 23) याला 16 फेब्रुवारीला अटक केली. तसेच आरोपींना न्यायालयाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींविरूद्ध तामिळनाडू, ठाणे, महाराष्ट्र, कर्नाटक, सहरानपुर, हैद्राबाद, तेलंगना, मिरत, सायबराबाद, गुरुग्राम इ. राज्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विदेशात नोकरी देण्याचे सांगून फसवणुक : आरोपींनी जॉब प्रोवाइडर कंपनी स्थापन केली आहे. सदर कंपनीचे रजिस्ट्रेशन नोकरी डॉट कॉम व टाईमजॉब्स डॉट कॉम यांच्याकडे केलेले होते. नोकरी डॉट कॉम व टाईमजॉब्स डॉट कॉम यांनी नमुद कंपन्यांना लॉग इन आयडी व पासवर्ड दिले होते. वरील नोकरी डॉट कॉम व टाईमजॉब्स डॉट कॉमवर रिझ्युम असलेल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या इसमांची माहीती नमुद साईटवर लॉगिन केले की, ती आरोपींच्या कंपनीला मिळत होती. त्यानुसार ते प्राप्त झालेल्या इसमांची माहीती घेऊन नोकरी शोधणाऱ्या इसमांना मेल तसेच मोबईल क्रमांकाव्दारे संपर्क साधून त्यांना विदेशात नोकरी देण्याचे आश्वासन देवून त्यांची फसवणुक करत होते.
आरोपींना अटक : या गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हयात नमुद आरोपीने वापरलेल्या मोबाईल क्रमांकांचा सीडीआर एसडीआर लोकेशन घेण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्याची माहीती प्राप्त करून त्यांच्या खात्यावरून पैसे कोठे वर्ग झालेबाबतची माहीती घेतली. पैसे विकास यादव आणि पीएनबी बँकेच्या खात्यांवर गेलेले होते. त्यानुसार माटुंगा पोलीस ठाण्याच्या सायबर अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक यांनी प्राप्त मोबाईल क्रमांकाचा अभ्यास केला. त्यांचे विश्लेषण करून आरोपींचे मुख्य बँक खाते प्राप्त केले. त्यानंतर आरोपींना स्थानिक पोलीस ठाणेच्या मदतीने दिल्ली, नोएडा व लखनऊ येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ लॅपटॉप, ४० सिमकार्ड, २५ डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड, तसेच ५ मोबाईल, ६ बँक पासबुक व चेकबुक हस्तगत करण्यात आले आहेत. पैसे ट्रान्सफर केलेल्या विकास यादवला देखील पोलिसांनी अटक केली आहे.