मुंबई - पावसाळ्यात अनेकवेळा मुंबईची तुंबई होते. रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प होते. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त होतात. अशावेळी मुंबईकरांच्या मदतीसाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महापलिकेकडून पूर आपत्ती व्यवस्थापन उभारले आहे. यावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगने ताशेरे ओढले आहेत. यामुळे पालिकेच्या कामाची पोलखोल झाल्याने त्याची चौकशी करून पालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. भाजप सरकारने हा शिवसेनेवर ठपका ठेवला असल्याचेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
जागतिक दर्जाच्या मुंबई महापालिकेच्या पूर आपत्ती व्यवस्थापनावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. त्याबाबत बोलताना गेले तीन दिवस पाऊस जास्त पडला हे मान्य आहे. पण, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही याला पर्जन्य जलवाहिन्या विभाग दोषी आहे. मुंबईकरांना दिलासा देण्यात महापालिका अपयशी ठरली, असा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजप सरकारने शिवसेनेवर ठपका ठेवल्याने पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी झोपेतून जागे होऊन, मुंबईकरांना त्याचे उत्तर देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यानी पालिकेच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पिकनिक स्पॉट झाला आहे. त्यात योग्य प्रकारे काम होत नाही, अशी टिका करत मुंबईत पाणी तुंबले तरी पाणी तुंबले नसल्याचे खोटे ट्विट केले जात असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.
पालिकेवर प्रशासक नेमावा - राखी जाधव
गेले तीन दिवस पावसामुळे मुंबईकरांना त्रास झाला. या त्रासामधून मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन व्यवस्था फेल ठरली आहे. याची सखोल चौकशी करून मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.
- - मार्च २०१८ पर्यंतच्या कामावर कॅगचे ताशेरे
- - मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम २२ पैकी १६ किमी झाले.
- - १२ पुलांच्या बांधकामांपैकी केवळ ५ पुलांचे काम पूर्ण
- - अन्य ५ पुलांचे बांधकामच सुरू झालेले नाही
- - पोईसर नदीच्या खोलीकरणावर २३० कोटी खर्च, तरीही ६० टक्के काम
- - गटारे प्रचंड गाळाने भरलेली आहेत.
- - पाण्याचा विसर्ग करणारी नलिका समुद्र पातळीच्या बरीच खाली.
- - ४५ विसर्ग नलिकांपैकी केवळ तीन ठिकाणी पुराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे.
- - २५ मिमी प्रतितास पावसासाठीच मुंबईतील गटारांची क्षमता.
- - मोठ्या नाल्यांमध्ये केबल्स, पाईपलाईनचा अडथळा.
- - नाल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष.
- - छोटे नाले अयोग्य जागी असणे आणि प्रभावी नाही.
- - नाल्यांची अयोग्य रचना.
- - एप्रिल २०१८ पर्यंत सल्लागाराने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अद्ययावत केल्याचा आराखडा सादर न केल्याने सहा वर्षाचा विलंब