मुंबई : पोलीस भरतीच्या नियमावलीनुसार एका उमेदवाराने एकाच ठिकाणी अर्ज करण्याची तरतूद आहे. मात्र, उमेदवारांनी अनेक पोलीस भरतीसाठी अर्ज केल्याने इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारने यांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी पोलीस भरतीत फॅार्म भरलेल्या उमेदवारांनी केली आहे. उमेदवारांनी मोठ्या संख्येने वेगवेगळी फसवी माहिती देऊन जवळपास पाच-सहा ठिकाणी एकाच उमेदवाराने अनेक ठीकाणी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी एकाच ठिकाणी अर्ज भरला, अशा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे असे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
उमेदवारांचे अनेक ठिकाणी अर्ज : गेल्या काही महिन्यापूर्वी सरकारने पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, काही उमेदवाराने अनेक ठिकाणी अर्ज भरल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. राज्यामध्ये पोलीस भरती करण्यासाठी शासनाने पोलिसांमधील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. चालक, शिपाई, तांत्रिक पदांसाठी एका उमेदवाराला एकाच ठिकाणी अर्ज करता येईल असा नियम आहे. उदाहरणार्थ नागपूर विभागामध्ये जर चालक पोलीस पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी एक उमेदवाराने एकाच ठिकाणी अर्ज करावा. मात्र, अनेक उमेदवारांनी नागपूर, मुंबई, नाशिक विभागात देखील विविध पदासाठी अर्ज केले आहे. तर दुसरीकडे ज्यांनी शासनाच्या नियमानुसार एकाच ठिकाणी अर्ज केला त्यांच्यावर अन्याय होत आहे.
नियमावलीनुसार एकच अर्ज : या संदर्भात महाराष्ट्र स्टुडन्ट युनियनचे प्रमुख, वकील सिद्धार्थ इंगळे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, शासनाच्या नियमावलीनुसार एका उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज भरायचा आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज भरला. त्यामुळे प्रामाणिक, नियमानुसार अर्ज भरणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. याचा सगळ्यात मोठा फटका ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे एकाच ठिकाणी अर्ज भरलाय त्या विद्यार्थ्यांना बसू शकतो.