मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सिएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेत ३० हून अधिक लोक जखमी झाले. या जखमींपैकी अनेक जणांच्या पायामध्ये लोखंडी सळ्या टाकल्याने ते पुढील दोन ते अडीच महिने चालू शकणार नाहीत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या दुर्घटनेने अनेकांना आपले काम, व्यवसाय सोडून पुढील २ ते अडीच महिने घरी बसावे लागणार आहे.
सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर २० जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला होता. १७ जखमींवर या रुग्णालयात उपचार सुरू होते. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जे. जे रुग्णलयात हलवण्यात आले. तर ७ जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले. बाकी ९ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. तर, ७ रुग्णांना फ्रॅक्चर असल्याने ऑपरेशन करून पायात सळ्या टाकण्यात आल्या आहेत. दोन जणांना ऑपरेशनची गरज नसल्याने फक्त देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
तर, जी. टी रुग्णालयात १६ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. यातील काही रुग्णांनी जीवन विमा असल्याने इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. उर्वरित ७ पैकी ३ जणांचे ऑपरेशन करून लोखंडी सळ्या टाकण्यात आल्या आहेत. तर ४ जणांना प्लास्टर करण्यात आले आहे. पायांमध्ये सळ्या टाकलेले रुग्ण पुढील दोन ते अडीच महिने आपल्या पायावर चालू शकणार नाहीत. या कालावधीत त्यांच्यावर रुग्णालयात ठेवून किंवा घरी पाठवून उपचार सुरूच राहणार आहेत. रुग्णांनी साथ दिल्यास दोन अडीच महिन्यानंतर हे रुग्ण चालू शकतील, अशी माहिती दोन्ही रुग्णालयातील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
म्हणून मृतांची संख्या वाढली नाही -
पूल पडण्याच्या दुर्घटनेनंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर आणि इतर स्टाफला ड्युटीवर बोलावून आम्ही रुग्णांवर चांगल्या प्रकारचे उपचार केले. यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यावर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती सेंट जार्ज व जी. टी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.