मुंबई - आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती ही गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात घसरली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या सद्याच्या आकडेवारीनुसार, सन २०१९-२० मध्ये जीडीपीचा विकासदर गेल्या १० वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत ६.१ वरुन ४.२ वर आला आहे. २०१९-२० च्या शेवटच्या त्रैमासिक काळात जीडीपीची आणखी घसरण होऊन विकासदर ३.१ वर येऊन पोहोचला आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत भारताचा विकासदर (जीडीपी) 3.1 टक्क्यांनी घसरला आहे. आधीच आर्थिक संकट त्यात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेचे व्यापक नुकसान झाले आहे. जो जीडीपी दर आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 6.1 टक्के होता तो 2019-20 मध्ये 4.2 टक्क्यावर आला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये झालेली ही घट वाईट ठरू शकते कारण लोकांच्या हालचालींवर बंधने आणि लॉकडाऊन कायम राहिल्याने आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत. 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाले आणि त्यानंतरच्या काही दिवसात देशभरातील व्यवसाय ठप्प झाले. अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएसओ) २९ मे रोजी जारी केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार महागाई निर्देशांक हा ३.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. जी अलीकडे जागतिक विकासाचे इंजिन होती, ती आता मंदीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. २०१९-२० या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२० मध्ये जीडीपीची घसरण ३.१ वर येऊन ठेपली आहे. हे या आकडेवारीनुसार कोरोना संकटकाळामुळे देशातील अर्थव्यवस्था आधीच घसरत असताना लॉकडाऊनमुळे त्यात २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत परिणाम होणार असून आणखी जास्त घसरण होण्याची शक्यता असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरुन लक्षात येते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2019-20 च्या तिमाहीत भारताच्या जीडीपी सुधारित 4.1 टक्के करण्यात आली. त्याच वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ही संख्या 4.4 टक्के आणि एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी 5.2 टक्के होती.