मुंबई- पुढील तीस वर्षात देशापुढे अनेक आव्हानं निर्माण होणार असून शाश्वत विज्ञान संशोधनातून देशातील तरुणाई आणि महिला शक्ती ही संकटं दूर करतील, असा विश्वास देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी व्यक्त केला. भारतातील पहिले जागतिक मेगा सायन्स प्रदर्शन 'विज्ञान समागम' मुंबईतील नेहरु विज्ञान केंद्रात आज पासून ( ८ मे) सुरू झाले असून प्रदर्शनाचे उद्घाटन निती आयोगाचे सदस्य व्हि. के सारस्वत यांच्या हस्ते झाले.
के. विजय राघवन यांनी '२०५० स्पेसशिप अर्थ' सादरीकरण करत पुढील ३० वर्षात चीन-भारत अर्थव्यवस्था मजबूत होणार असून लोकसंख्याही वाढणार असल्याचे सांगितले. जागतिक तापमानवाढ मोठी समस्या असणार आहे आणि समुद्राची पातळी वाढण्याची भिती भारतालाही असल्याचे त्यांनी सांगितले. वातावरण, पर्यावरण, डीपओशन, आऊटर स्पेस, सुक्ष्मजीव, ब्रेन, ओरीजीन ऑफ लाईफ, नेवीअर स्ट्रोक रिवोल्यूशन वर त्यांनी माहिती दिली.
'सेक्युअरींग फ्युचर' ही संकल्पना तरुणाईत गुंतवणुक करुन साध्य होईल. इंडीया-भारत दरी कमी करण्यासाठी वंचित क्षेत्रात प्रगतीची चाके फिरवावी लागणार आहेत. तसेच महिला या 'सिक्रेट वेपन' असून विज्ञान क्षेत्रात महिलांचा समावेश वाढला पाहिजे. देशाची भविष्यातील वैज्ञानिक क्षमता महिला आणि तरुणांमध्ये असल्याचेही राघवन यांनी सांगितले.
यावेळी निती आयोगाचे सदस्य व्हि. के. सारस्वत म्हणाले की, आपल्या देशातील गुणवत्तेचा ओघ परदेशात गेला आहे. भारतात पंडीत जवाहलाल नेहरुंनी विज्ञानाचा पाया घातला. तसेच सर्व समस्यांचे निराकरण विज्ञानातून करता येईल. अंतराळ आणि अणुशास्त्रात देशानं मोठे योगदान दिले असल्याचेही सारस्वत यांनी सांगितले.