मुंबई - इस्रोतर्फे आज (सोमवारी) चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 'भारतासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. आपल्या युवापिढीला भविष्यात खूप काही शिकायला मिळणार आहे. भारत नक्कीच चंद्रावर रोव्हर उतरवणारा चौथा देश बनेल.' अशी आशा शास्त्रज्ञ जतीन राठोड यांनी व्यक्त केले. आपण मानवला चंद्रावर पाठवेल तो दिवस दूर नाही असेही राठोड म्हणाले.
चांद्रयान-२ ने काही वेळापूर्वीच अवकाशात झेप घेतली. ठरलेल्या वेळेप्रमाणे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. या यानाला चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. मागील आठवड्यातील सोमवारी हे प्रक्षेपण होणार होते. मात्र, हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलैला होणारे हे उड्डाण ५६ मिनिटांआधी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आज, कोणत्याही अडचणी शिवाय हे उड्डाण यशस्वीरित्या पार पडले आहे.