मुंबई - राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
मुंबईत म्यूकरमायकोसिस 111 रुग्ण -
कोरोना नियंत्रणात येत असतानाच कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये 'म्युकरमायकोसिस' आजार होण्याचे प्रकार समोर आले आहेत. या आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार होणे गरजेचे असते. मुंबईत सद्यस्थितीत 'म्युकर मायकोसिस'चे 111 रुग्ण पालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेच्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये या रुग्णांचे निदान झाल्यानंतर तातडीने आवश्यक उपचार केल्यामुळे सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचारही सुरू असून त्यांना देखरेखीखाली ठेवले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अहमदनगरमध्येही 2 रुग्णांची नोंद -
जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात एक-एक म्युकर मायकोसिसचा रुग्ण आढळला असून जामखेडच्या रुग्णांवर नगरमध्ये तर श्रीगोंदा येथील रुग्णावर पुण्यात उपचार सुरू आहे.
जळगावमध्ये म्यूकरमायकोसिसने 6 जणांचा मृत्यू -
कोरोना पाठोपाठ आता म्युकर मायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार हातपाय पसरत आहे. हा आजार दुर्मिळ आणि जुनाच आजार आहे. मात्र, कोरोनामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने त्याने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्समुळे हा आजार बळावत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात 6 जणांचा बळी गेला आहे.
नागपूर म्यूकरमायकोसिसच्या 40 रुग्णांची नोंद -
कोरोनाच्या आजारामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यातच आता पोस्ट कोविडमध्ये इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. आता म्यूकर मायकोसीस नामक बुरशीजन्य आजराच्या लक्षणे दिसू लागले आहे. दातांच्या जबड्यात दिसणारा आजार नाक, डोळे, मेंदू या अंगासाठी घातक ठरत आहे. नागपूरच्या दंत महाविद्यालयात 40 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या वाढत आहे.
हेही वाचा - 'तौक्ते'मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3, 375 हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान