मुंबई - राज्यात गेल्या ३ वर्षापेक्षा यंदा गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ( Increase in the number of measles patients ) झाली आहे. राज्यात आतापर्यंत १० हजार ५४४ गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ६५८ रुग्णांना निश्चित गोवर ( measles patients ) झाल्याचे निदान झाले आहे. तर १३ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला ( 13 children died due to measles ) आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी ठाणे हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
१० हजार ५४४ संशयित रुग्ण, १३ मृत्यू - राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी २६ नोव्हेंबरपर्यंत १० हजार ५४४ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ६५८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १०, भिवंडीत २ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १३ मृत्यूंपैकी ९ संशयित तर ४ निश्चित निदान झालेले मृत्यू आहेत. आतापर्यंत ६ मुलींचा तर ७ मुलांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानिहाय गोवरचा प्रसार - मुंबईत ३ हजार ९४७ संशयित रुग्ण असून २९२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ७५७ संशयित रुग्ण असून ६२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ५०३ संशयित रुग्ण असून ४६ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ३६३ संशयित रुग्ण असून ४४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. ठाणे जिल्हा येथे ११५ संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई - विरार मनपा येथे १६९ संशयित रुग्ण असून ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १३२ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २१४ संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.
गोव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सूचना! देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत.
परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय! - ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे त्या भागामध्ये नियमित लसीकरणाच्या नेहमीच्या डोस व्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी. राज्यातील कोणत्या भागात हे उद्रेक प्रतिसाद लसीकरण सुरू करावयाचे याचा निर्णय स्थानिक परिस्थितीचे अवलोकन करून त्या त्या राज्याने घ्यावयाचा आहे. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करुन कोणत्या भागात सहा महिने ते नऊ महिन्याहून लहान बालकांमध्ये गोवरचे प्रमाण दहा टक्क्यांहून अधिक आहे याचा निर्णय संबंधित राज्याने घ्यावयाचा आहे.
६ महिन्यावरील बालकांना लस - ज्या भागांमध्ये सहा महिने ते नऊ महिन्यापेक्षा लहान बाळांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा भागामध्ये सहा महिने ते नऊ महिन्याहून लहान वयांच्या बाळांमध्ये गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी. या अधिकच्या मात्रेनंतरही या बालकांचे गोवर आणि रूबेला लसीकरण नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार करण्यात यावे.
संशयित रुग्ण -
२०१९ - १ हजार ३३७
२०२० - २ हजार १५०
२०२१ - ३ हजार ६६८
२५ नोव्हेंबर २०२२ - १० हजार ५४४