मुंबई: १ जानेवारी ते १९ मार्च २०२३ या कालावधीत इन्फल्युएंझाची लक्षणे असलेले ३,०५,२४३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १७६२ रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आले. आतापर्यंत एच १ एन १ चे ४०७ तर एच ३ एन २ चे २१७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १५५ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. राज्यात एच १ एन १ मुळे ३ मृत्यू झाले आहेत. एच३ एन२ मुळे अहमदनगर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वाशीम, पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट तसेच पुणे येथील ३ संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालानंतर या तीन मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
इन्फल्युएंझाचे एकूण ६२४ रुग्णांची नोंद: देशभरात गेल्या काही दिवसात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यातील एच १ एन १ च्या रुग्णांचा आकडा ४०७ वर तर एच ३ एन २ च्या रुग्णांचा आकडा २१७ वर पोहचला आहे. राज्यात इन्फल्युएंझाचे एकूण ६२४ रुग्णांची नोंद झाले आहेत. एच ३ एन २ या व्हायरसने १ मृत्यू झाला असून ३ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. तर हात धुणे, मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करणे या उपाययोजनांमुळे विषाणूचा प्रसार रोखता येऊ शकतो.
कोरोनाचे १२८ नवे रुग्ण : राज्यात गेले तीन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. आज राज्यात कोरोनाच्या १२८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ७२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १३६४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ८१ लाख ३९ हजार ८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९ लाख ९० हजार ७३ रुग्ण बरे झाले असून १ लाख ४८ हजार ४२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये आज ३५ नव्या रुग्णांची नॉन झाली आहे. मुंबईत २९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
काय आहे इन्फल्युएंझा: इन्फल्युएंझा हा आजार विषाणूमुळे पसरतो. इन्फल्युएंझा ए चे एच १ एन १, एच २ एन २, एच ३ एन २ हे व्हेरियंट आहेत. या आजारात ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव, चालताना धाप लागणे, न्यूमोनिया सारखी लक्षणे आढळतात. ओपीडी तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. जे नागरिक रुग्णांच्या संपर्कात आले आहेत त्याचाही शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू असलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करा अशा सूचना आरोग्य विभागाने रुग्णालयांना दिल्या आहेत. मृत्यू झाल्यास त्याचे डेथ ऑडिट करावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.