मुंबई : मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांना आपले कुटुंब आणि समाजासाठी कर्तव्य या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडाव्या लागतात. या जबाबदाऱ्या पार पडताना करावी लागणारी तारेवरची कसरत ही नावाजण्याजोगी असते. मुंबईत पहिल्याच टप्प्यातील ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्यात येईल. पुढे टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईत प्रादेशिक स्तरावर हिरकणी कक्षांची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलात एकूण 31 हजार पोलीस कर्मचारी आणि चार हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आहेत. यामध्ये 6700हून अधिक महिला पोलीस कर्मचारी आहेत. तर 700 ते 800 महिला पोलीस अधिकारी कर्तव्य बजावत आहेत.
राज्य शासनाचे धोरण: बाळांना स्तनपान करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी पोलीस ठाण्यातही हिरकणी कक्ष उभारण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना स्तनपान करण्यासाठी 60 बाय 60 ची स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी असे धोरण राज्य शासनाने 2012 मध्ये आखले होते.
येथेही असावा हिरकणी कक्ष: शासनच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक आणि रहदारीच्या ठिकाणी महत्त्वाची शासकीय कार्यालय पोलीस स्थानके जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी ती सोय उपलब्ध नाही. मुंबई पोलीस आयुक्तालयासह पोलीस ठाणे विभाग कार्यालयात हिरकणी कक्ष सुविधा उपलब्ध नाही.
आमदार सरोज अहिरे यांचा इशारा: आपल्या नवजात बाळाला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आलेल्या आमदार सरोज अहिरे यांनी 27 फेब्रुवारी, 2023 रोजी सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिला होता. हिरकणी कक्षाची अधिवेशनात केलेली स्थापना अत्यंत गैरसोयीची असून सरकारने महिलांची थट्टा केली आहे. त्यामुळे या अधिवेशनातून निघून जाण्याचा इशारा आमदार सरोज अहिरे यांनी दिला होता.
महिला आमदाराची नाराजी: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या चार महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन विधानभवनात दाखल झाल्या. परंतु या ठिकाणी हिरकणी कक्ष व्यवस्थित स्थितीत नसल्या कारणाने त्यांना येथून काढता पाय घ्यावा लागला. या बद्दलची नाराजगी त्यांनी मीडिया समोर बोलून दाखवली.
कसा आहे हिरकणी कक्ष?: विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात केवळ दोन खुर्च्या आणि दोन सोपे ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी दुसरी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे आपण या अधिवेशनात थांबायचे की नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मला माझ्या मुलाची काळजी आहे. माझ्या कुटुंबांकडे तो सध्या सुरक्षित आहे. मात्र हा हिरकणी कक्ष सुरक्षित नाही. बाळाला भरवायचे असेल किंवा अन्य काही असेल तर त्या बाबतीत या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही. राज्य सरकार केवळ महिलांची या निमित्ताने थट्टा करीत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा: PMPML Contractors Strike : 'पीएमपीएमएल'च्या ठेकेदारांचा अचानक संप; प्रवाशांची गैरसोय