मुंबई - कोरोना संक्रमणाचा फटका सगळ्यात अधिक महाराष्ट्र पोलीस खात्याला बसलेला असून गेल्या 24 तासात राज्य पोलीस खात्यातील 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 424 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण 16015 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये 1736 पोलीस अधिकारी ते 14279 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्यस्थितीत राज्यात तब्बल 2838 पोलीस हे कोरोना संक्रमित असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 395 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून 2443 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, राज्यात आतापर्यंत 13104 पोलीस कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहे. यामध्ये 1326 पोलीस अधिकारी तर 11688 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 163 पोलिसांचा मृत्यू झाला असून यात 15 पोलीस अधिकारी तर 148 पोलीस कर्मचारी आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार आतापर्यंत 2,47,395 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 829 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 349 घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 892 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, अवैध वाहतूक केल्याप्रकरणी आतापर्यंत 34 हजार 361 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 96,121 वाहने जप्त केली असून तब्बल 23 कोटी 71 लाख 62 हजारांचा दंड वसूल केला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 72 घटना घडल्या असून 89 पोलीस हे जखमी झाले आहेत.