मुंबई - रेल्वे टीसींना (तिकीट तपासनीस) मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तिकीट तपासनी करणाऱ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच असून मंगळवारी मध्य रेल्वेच्या उल्हासनगर स्थानकात एका विनातिकीट प्रवाशाने टीसीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात टीसी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
टीसींना मारहाणीच्या प्रकरणात गेल्या दीड महिन्यात 3 घटना मुंबई रेल्वेमध्ये घडल्या आहेत. २७ सप्टेंबरला महिला टीसीसोबत बामन डोंगरीला पहिली घटना झाली. २८ ऑक्टोबर महिन्यात दुसरी अशीच घटना कुर्ला स्थानकात घडली. उल्हासनगरमध्ये काल संध्याकाळची तिसरी घटना घडली. या सर्व टीसींना अज्ञात प्रवाशी व्यक्तींनी तिकीट तपासत असताना मारले आहे. टीसी हे लोकांचे सेवक आहेत, त्यामुळे टीसींना मारहाण करू नये, त्यामुळे आपलेच नुकसान आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आवाहन केले.
हेही वाचा - उद्धव ठाकरे सांगली, साताऱ्यातील दुष्काळग्रस्त गावांना देणार भेट