नवी मुंबई : एका ट्रॅफिक पोलिसाच्या बोनेटवरून फरपट नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिद्धेश्वर माळी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सिग्नल तोडत असताना वाहतूक पोलिसांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने गाडी थांबवली नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी गाडीच्या बोनेटला धडक दिली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्रॅफिक पोलीस गाडीच्या बोनेटवर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
रेड सिग्नलवरून गाडी नेली पुढे : शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ब्लू डायमंड जंक्शन येथे ट्रॅफिक पोलीस सिद्धेश्वर माळी हे ड्युटीवर होते. तेव्हा रेड सिग्नल तोडून, स्कूटरला धडक देऊन जाणाऱ्या कार चालक त्यांच्या निदर्शनास आला. ट्रॅफिक पोलीस सिद्धेश्वर माळी यांनी त्या कारचालकास थांबविण्याचा प्रयत्न केला. ती कार चालविणाऱ्या आदित्य बेमडेने कारचा वेग आणखी वाढवला. थांबविण्याचा प्रयत्न करीत असता, ट्रॅफिक पोलिस सिद्धेश्वर माळी हे कारच्या बोनेटवर आदळले. त्यानंतर पुढे गेल्यावर त्यांचे सहकारी शिंदे यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या घडामोडीची माहिती दिली, एक पथक तातडीने आदित्य बेमडे यांच्या गाडीकडे रवाना झाले. अखेर त्यांना रोखण्यात यश आले. नंतर वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले तेव्हा तपासणीत आदित्यने गांजा सेवन केल्याचे आढळून आले.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल : आरोपी आदित्य बेमडे सिग्नल तोडून जात असताना सिद्धेश्वर माळी या पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोपी आदित्यने गाडी थांबवली नाही. तेव्हा ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर आदळले. यासंबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्रॅफिक माळी हे कारच्या बोनेटवर स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहेत. सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.