मुंबई - मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला. आता या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान मुंबई, इंदुर, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी छापे टाकून ईडीने निवासी, व्यावसायिक व इतर प्रकरणातील 32 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूवी या वाहिन्यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तब्बल 46 कोटी रुपयांच्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात या वाहिन्यांच्या विरोधात ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने केलेल्या तपासात, बॅरोमीटरच्या माध्यमातून टीआरपीमध्ये फेरफार करून फक्त मराठी, महा मुवी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा टीआरपी हा वाढवण्यात आला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी 1 हजार 800 बेरो मीटरचा वापर करण्यात आलेला आहे. तर, देशभरात जवळपास ४४ हजार बॅरोमीटर वापरण्यात येत आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या दोन वाहिन्यांसाठी काही घरात टीआरपी फेरफार करणारे बॅरोमीटर लावण्यात आले होते. ज्यामुळे या दोन वाहिन्यांचा टीआरपी पंचवीस टक्क्याहून अधिक दाखवण्यात आलेला होता.
मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
टीव्ही वाहिन्यांच्या टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले की, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल(बार्क) ही कंपनी भारतात टीव्ही चॅनल्स, टीव्ही प्रोग्रॅमचे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारी एकमेव कंपनी आहे. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बार्क काम करत असून टीआरपी मोजण्यासाठी या कंपनीकडून भारतातील ठराविक घरांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र लावण्यात येते. मुंबईत १ हजार ८०० हजार बॅरोमीटर लावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, या कंपनीच्यावतीने हंसा रिसर्च ग्रुप या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले होते. यात फेरफार झाल्याचा आरोप आहे. टीआरपीसाठी निवड करण्यात आलेल्या कुटुंबीयांना काही ठराविक काळात एखादीच वाहिनी सुरू करून ठेवण्यास सांगण्यात येत होते. त्यासाठी त्यांना पैसे दिले जात असल्याचे तपासात पुढे आले.
हेही वाचा - अमली पदार्थ विकणारा 'सिव्हिल इंजिनअर' पोलिसांच्या ताब्यात; ६३ किलो गांजा जप्त