मुंबई - मुंबई पालिकेच्या कारभारात सर्वत्र सल्लागारांचा शिरकाव झाला आहे. सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय पालिकेचे कोणतेही काम होत नाही. असाच प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. कोरोना व्हायरसच्या संशयीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयातील सुविधांबाबत एका ब्रिटिश सल्लागाराने तक्रार केली आहे. त्यानंतर रुग्णालयाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
मुंबई पालिकेचा २०२० -२१ चा ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त बोलत होते. यावेळी बोलताना मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीसाठी २ ब्रिटिश सल्लागार आले होते. त्यापैकी एकाला जास्त ताप आल्याने त्याला कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण म्हणून कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या संशयित व लागण झालेल्या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले जाते. त्याप्रमाणे त्यालाही आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. एका दिवसानंतर त्याने या रुग्णालयात वातानुकूल यंत्रणा (एसी), मनोरंजनासाठी टीव्ही नाही अशी तक्रार केली. रुग्णालयात अशा सुविधा नसल्याने माझी प्रकृती आणखी खालावेल अशी भीती त्याने व्यक्त केली. या सल्लागाराच्या दोन रक्त चाचण्यांमधून त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संशयित रुग्णांना रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवावे लागते. त्यांना त्याठिकाणी कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. हे या प्रकरणावरून उघड झाल्याने कस्तुरबा रुग्णालयाचे बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोना व्हायरस सारख्या संसर्गजन्य आजाराची साथ आली, तर त्याचे निदान, वैद्यकीय निष्कर्ष तातडीने मिळावेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. रुग्णांना एकटे वाटू नये म्हणून करण्यात आलेल्या तरतुदींमधून आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांसाठी मनोरंजनाची साधनेही असतील, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
रुग्णालयाची नवीन इमारत -
मुंबईत कोणतीही संसर्गजन्य साथ आल्यावर त्या रुग्णांना उपचारासाठी पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जाते. जळालेल्या आणि काविळच्या उपचारासाठीही हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हजार नागरिक कोरोना व्हायरसने बाधित झाले आहेत. चीनच्या हुबेई प्रातांतही आणखी ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसने भारतात शिराकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारामध्ये सुसज्ज अशी ३ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये १४० खाटा असतील. अशा प्रकारची ही पहिली विलगीकरण करण्यात आलेली इमारत असेल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून रुग्णाला दूर ठेवता येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.