मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वची बैठक बोलावली आहे. पक्षाची पुढच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.
राज्यातील सत्ता नाट्यानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पक्षाची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आहे. तर, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे, राज ठाकरे जनतेची प्रश्न घेऊन राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला एकाच वेळी लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एप्रिलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीची निवडणूक आहे. ही अंतर्गत बैठक असून लोकांमध्ये संघटनरीत्या काम कसे करायचे याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे, असे मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी सांगितले. त्याचबरोबर, येत्या १३ तारखेला राज्यातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष व १४ तारखेला महिला व पुरुष विभागाध्यक्ष यांची बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती देखील नांदगावकर यांनी दिली.
हेही वाचा- शरद पवारांचा वाढदिवस 'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून होणार साजरा