मुंबई - काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेनेत प्रवेश केला. यावरून काँग्रेसच्या ओबीसी विभागात तिव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने हरिभाऊ राठोड यांची तत्काळ हकालपट्टी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमित कारंडे यांनी केली आहे.
ओबीसींसंदर्भात हरिभाऊ राठोड यांचे कोणतेही योगदान नव्हते. केवळ ते स्वतःचे राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी ओबीसींचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. मात्र त्यांना राज्यातील ओबीसी समाज अद्याप ओळखतही नसल्याचा आरोप कारंडे यांनी केला. आतापर्यंत केवळ बंजारा समाजाच्या नावाने त्यांनी नेतृत्व करत काँग्रेसकडून आमदारकीसह अनेक प्रकारचे लाभ घेतले. मात्र, आता त्यांनी काँग्रेसवर केलेले सर्व आरोप हे अत्यंत बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे कारंडे म्हणाले.
हेही वाचा - मी संजय निरुपम यांना समजवण्याचा प्रयत्न करेन - एकनाथ गायकवाड
राज्यातच नव्हे तर देशात ही काँग्रेसने ओबीसी समाजाला खूप मोठा न्याय मिळवून दिलेला आहे. देशभरात ओबीसी समाजाचे नेते घडवलेले आहेत. यामुळे ओबीसी समाजाचे असंख्य प्रश्न सुटले असल्यामुळेच ओबीसी विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन पोहोचला आहे. असे असताना बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि या समाजात ही आता आपले अस्तित्व गमावलेल्या हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसवर बेछुट आरोप करणे हे चुकीचे असून त्यांची काँग्रेसने तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, हरिभाऊ राठोड यांच्यावर पक्षाकडून तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.