मुंबई- जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. असे असताना मुंबई महापालिकेच्या शाळांमधील तब्बल तीन हजार शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या नियमानुसार होत नसल्याने त्याला त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून गरीब व गरजू घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यासाठी पालिका शाळा चालवते. तसेच शिक्षकांची नेमणूक करते. पालिका शाळांमध्ये सध्या पावणे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून दहा हजार शिक्षक काम करत आहेत. दरवर्षी जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. या वर्षीही शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असताना, तीन हजार शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष सूरु झाल्यावर तिमाही परीक्षांची सुरुवात होत असते. परिक्षां दरम्यान बदल्या केल्या जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या शिक्षकांनी पालिका शिक्षण विभाग अतिरिक्त आयुक्त तसेच विरोधी पक्ष नेत्यांना पत्र देऊन बदल्या थांबवण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनीही पत्र देऊन बेकायदेशीर बदल्या थांबवण्याची मागणी केली आहे.
पालिका शाळांचा दहावीचा निकाल कमी लागला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर बदल्या केल्यामुळे निकाल कमी लागल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल, असे रवी राजा यांनी म्हटले आहे. पालिकेच्या नियमानुसार जानेवारीमध्ये बदल्यांची यादी बनवली जाते. एप्रिलमध्ये सुट्टीमध्ये बदल्या केल्या जातात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर बदल्या करायची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत, या बदल्या पालिकेच्या नियमानुसार पुढील वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना विश्वासात घेऊन कराव्यात. अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.