मुंबई - केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने नुकतीच आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आयुष डॉक्टरही अॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. पण अॅलोपॅथी डॉक्टरांनी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने याला जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचे म्हणत आयएमएने 11 डिसेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. 11 डिसेंबरला 12 तास डॉक्टर संपावर जाणार असून आजपासून महाराष्ट्रासह देशभर विविध माध्यमातून आंदोलन, निदर्शने केली जाणार आहेत. आयुर्वेदिक शस्त्रक्रिया संबंधीचा निर्णय रद्द केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आयएमएने दिला आहे.
'हा' आहे केंद्राचा निर्णय
आयुष डॉक्टर आणि अॅलोपॅथी डॉक्टर देशभरात रुग्णसेवा देतात. आयुष डॉक्टर हे आयुर्वेदिक केवळ उपचार देतात. ते कुठलीही शस्त्रक्रिया करत नाहीत. अॅलोपॅथीमधील एमएस डॉक्टर शस्त्रक्रिया करतात. तसे शिक्षण त्यांनी घेतलेले असते. आयुर्वेदिक म्हटले की जडी-बुटी वा इतर काही औषधोपचार इतकेच असते, असे असताना आता केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. त्यानुसार शल्य आणि शाल्याक (इएनटी) आयुष डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकणार आहेत.
...हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळ
केंद्र सरकारच्या या निर्णयाला आयएमएने तीव्र आक्षेप घेतला आहे. आयुर्वेदिक शस्त्रक्रिया कशी असू शकेल? शस्त्रक्रियेचे कोणतेही शिक्षण नसताना, अशी परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे. असा निर्णय केंद्र घेऊच कसे शकते? असा सवाल आयएमए महाराष्ट्रचे सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी केला आहे. कान, नाकाची शस्त्रक्रिया जर हे डॉक्टर करू लागले तर त्याचे रुग्णांवर गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी जर या डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी मिळाली तर एमबीबीएसचे शिक्षण घेण्याऱ्यांवर हा अन्याय आहे, अशीही भूमिका आयएमएने घेतली आहे.
आजपासून देशभर आंदोलन
या निर्णयाला आयएमएने विरोध करत हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. तर या मागणीसाठी आजपासून आंदोलन सुरू केले आहे. देशभरात आज आयएमएचे डॉक्टर विविध माध्यमातून आंदोलन करणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातही आजपासून आंदोलनाला सुरुवात होत असल्याची माहिती ही डॉ. बंदरकर यांनी दिली. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांपासून तज्ज्ञ वरिष्ठ डॉक्टरांपर्यंत सर्व जण या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आजपासून कुठे गेट मीटिंग, कुठे काम बंद, कुठे निषेध सभा तर कुठे निदर्शने होणार आहेत. तर 11 डिसेंबरला देशभरातील डॉक्टर संपावर जाणार आहेत.
कोरोना रुग्णसेवा मात्र सुरळीत राहणार
आयुर्वेदिक शस्त्रक्रियेच्या निर्णयाविरोधात 11 डिसेंबरला आयएमएने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 6 असे 12 तास काम बंद आंदोलन देशभरातील डॉक्टर करणार आहेत. मात्र, या आंदोलनादरम्यान डॉक्टर केवळ कोरोना रुग्णांना सेवा देणार आहेत. म्हणजेच या आंदोलनाचा कोणताही परिणाम कोरोना रुग्णसेवेवर होणार नाही. कोरोना रुग्ण वगळता इतर कोणत्याही रुग्णांना डॉक्टर सेवा देणार नाहीत. त्यामुळे 11 डिसेंबरला कोरोना वगळता इतर रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता आहे.