मुंबई - कोरोनाचा कहर मुंबईसह राज्यात वाढत आहे. अशात लॉकडाऊनमध्ये परदेशातून जे भारतीय नागरिक मुंबईत येत आहेत आणि राज्यातील जे मजूर-नागरिक स्थलांतर करत आहेत, त्या सर्वांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली गेली आहे. या चाचण्या केल्या नाहीत तर, मुंबईतील परिस्थिती आणखी बिकट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
शिवाय ग्रीन झोनमध्ये असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊन तेथील परिस्थितीही गंभीर होईल, असे म्हणत ही मागणी केली गेली आहे. जगभरात अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हजारो नागरिक विविध देशात अडकले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यात भारतात, मुंबईत आणले जात आहे. तर मुंबईसह विविध जिल्ह्यातील मजूर लॉकडाऊनमुळे उपासमारीची झळ सोसत आहेत. त्यांना त्यांच्या गावी पोहोचवले जात आहे. मात्र, हे करत असताना केंद्र सरकारच्या कोरोना संदर्भातील नव्या धोरणानुसार त्यांची केवळ स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या स्क्रिनिंगमध्ये काही लक्षणे आढळली तरच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
सध्या कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना स्क्रिनिंगद्वारे शोधता येत नाही. तेव्हा यातील अशी व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढवू शकते. सोबतच लक्षणे नसलेल्या रुग्णाची चाचणीच न झाल्याने उपचार न झाल्यास त्याच्यासाठीही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा हे सर्व टाळण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाची आणि मुंबईतून विविध जिल्ह्यात जाणाऱ्याची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी सोमवारी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली गेली. आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. तर यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.