मुंबई - मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने देशभरात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. मात्र, आता ऑक्सिजन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेने नुकताच प्रयोग केला आहे. त्यात आयआयटी मुंबईला यश सुद्धा आले आहे.
चाचणी यशस्वी -
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने देशातील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सर्जनशील आणि कल्पक उपाय शोधून काढला आहे. पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सीजन युनिटमध्ये यशस्वीपणे रूपांतरण केले आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये याचे आशादायी परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93 टक्के ते 96 टक्के शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजन उत्पादन साध्य करता येते. या ऑक्सीजन वायूचा उपयोग विद्यमान कोरोना रुग्णालयांमध्ये तसेच येऊ घातलेल्या कोविड -19 विशेष सुविधा केंद्रांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी कोविड उपचारासंबंधीत गरजा भागविण्यासाठी केला जाऊ शकतो.
आपत्कालीन परिस्थिती होणार मदत -
या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे आयआयटी मुंबईचे अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून हे केले गेले आहे. कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी अशी काही नायट्रोजन संयंत्रे भारतभर विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या संयंत्रात रूपांतर करू शकेल, अशाप्रकारे सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत हे आपल्यासाठी सहाय्य्यकारी ठरू शकते, असेही अत्रे यांनी नमूद केले. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सीजन संयंत्र उत्पादक असलेले स्पॅन्टेक इंजिनियर्स, मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू आहे.