मुंबई - कोरोनाच्या या संकटकाळात मध्य रेल्वे विविध प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 26 जुलैच्या मध्यरात्री मुंबई-वाराणसी या विशेष रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला रेल्वे इगतपुरी स्थानकात पोहोचताच प्रसव कळा सुरू झाल्या. यावेळी तातडीने रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती देण्यात आली. रात्री उशिरा रेल्वेच्या वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली.
गाडी क्रमांक 01093 मुंबई-वाराणसी विशेष रेल्वे इगतपुरीला येणार होती. त्या रेल्वेतून प्रियांका नावाची गर्भवती महिला प्रवास करत होती. त्या महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्याची माहिती मिळताच महिलेला मदत करण्यासाठी इगतपुरीचे स्थानक उप व्यवस्थापक अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली.
तातडीने अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना आणि त्यांचे पथक रूग्णांच्या वैद्यकीय सहाय्यासाठी धावून आल्या. त्यांनी त्या महिलेला इगतपुरी येथेच उतरण्याचा सल्ला दिला. प्रसुती वेदना होत असलेल्या प्रियांकाने रेल्वे आरोग्य पाथकाच्या सहाय्याने स्थानकावरच निरोगी बाळाला जन्म दिला. नवजात बाळ आणि महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय, इगतपुरी येथे रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले.