मुंबई - महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठांतील तसेच महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 24 सप्टेंबरपासून राज्यस्तरीय लेखणी बंद, काम बंद आंदोलन केले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात असल्याने आता या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. या आंदोलनात एसएनडीटी मुंबई महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या स्थानिक शाखेतील पदाधिकारी व सर्व सदस्यांनी महासंघाने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
या आंदोलनाची दखल घेत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संघटनेबरोबर बैठक घेतली. शिक्षकेतर संघटनांनी केलेल्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत मुख्यमंत्री व सचिव विभागाशी योग्य चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यातचे आश्वासन दिले आहे. पण, आंदोलकांनी लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचे सांगितले. येत्या एक तारखेपर्यंत काही ठोस निर्णय सरकारने घेतला नाही तर 1 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद, लेखणी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी महासंघ एसएनडीटी विद्यापीठाचे महासचिव यशवंत गावडे यांनी दिली.
हेही वाचा - मणिकर्णिका प्रकरण : महापालिकेची कारवाई बेकायदेशीर, कंगनाच्या वकिलाचा युक्तीवाद