मुंबई - वरळी मतदार संघ हा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. बुधवारी आदित्य यांनी वरळी मतदार संघातील कोळीवाड्याला भेट दिली.
कोळीवाड्यातील नागरिकांनी आदित्यचे उत्साहात स्वागत केले. त्यांनी गोल्फा देवीचे दर्शन घेऊन नवरात्रोत्सव मंडळांना भेट दिली. आदित्य गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मी माझ्या मतदारसंघातील देवी आणि महिलांचा आर्शिवाद घेण्यासाठी आलो आहे. मी सर्वांना सोबत घेऊनच विकास करणार आहे. मी स्वप्न बघत नाही. कायम पाय जमिनीवरच असावेत ही शिकवण मी अजूनही विसरलेलो नाही. माझ्या समोर कोण असेल हे निश्चित नाही, असे आदित्य यांनी सांगितले.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंच्या 'केम छो वरळी' होर्डिंगचे गूढ कायम
मनसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, यात वरळी विधानसभा मतदार संघातून उमेदवार दिलेला नाही. याबाबत आदित्य यांना विचारले असता माझ्यापाठी सर्वांचे आशीर्वाद आहेत, असे त्यांनी उत्तर दिले. आदित्य यांच्या वरळी-कोळीवाडा भेटीवेळी परिसरात उत्साह होता. महिलांनी नाचत-गात त्यांचे स्वागत केले. गोल्फादेवी मंदिरात आदित्य यांच्या विजयासाठी साकडे देखील घालण्यात आले.