मुंबई : आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन 'डे' म्हणजे अर्थात प्रेमाचा दिवस. व्हॅलेंटाईन 'डे'चा मुहुर्त साधून बहुतांशी प्रेमीयुगुल या दिवशी आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करतात. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे प्रेमी युगुलांना हा मुहूर्त साधता आला नव्हता. त्यामुळे यंदा व्हॅलेंटाईन 'डे'च्या दिवशी शेकडो प्रेमीयुगुलांनी लग्नाचा बार उडवला आहे. व्हॅलेंटाईन 'डे'चा मुहूर्त साधत मुंबईतच आज शेकडो प्रेमी युगल विवाहबद्ध झाले आहेत.
विविध मंदिरात वऱ्हाडी मंडळींची गर्दी : व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचे मनसुबे मनात बाळगून आज मुंबईमध्ये शेकडो जोडपी विवाहबद्ध झाली. प्रेमीयुगुलांनी व्हॅलेंटाईन 'डे'चा मुहूर्त साधत आज धुमधडाक्यात प्रेमाचा बार उडवला. व्हॅलेंटाईन 'डे' म्हणजे जागतिक प्रेमदिन याच दिवशी विवाह बंधनात अडकण्याची प्रेमीयुगुलांची नेहमी धडपडत पाहण्यास मिळते. यासाठी विवाह नोंदणी कार्यालयही तितक्याच सज्जतेने या नव्या जोडप्यांचा उत्साह वाढवतात. मुंबईतील वांद्रे येथील विविध मंदिरात मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच ही जोडपी आपल्या वऱ्हाडी मंडळींसह विवाह सोहळ्यासाठी आली होती. गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे बहुतांश प्रेमीयुगुलांना हा मुहूर्त साधता आला नव्हता. त्यातच मागच्या वर्षी पासून कोरोना आटोक्यात असल्याने मोठया प्रमाणात लग्नाचे बार उडविले गेले आहेत.
पुढल्या वर्षी रिटाला भेटणार ३ गिफ्ट : मुंबईत विशेष करून वांद्रे येथे पूर्व, पश्चिम दोन्ही ठिकाणी असलेल्या विविध मंदिरांमध्ये ही जोडपी विवाह बंधनात बांधली गेली. याप्रसंगी सर्वच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वऱ्हाडी मंडळींची गर्दी दिसून आली. विशेष आजच्या दिवशी पुजरी, वकिलांना सुद्धा मोठी मागणी असते. आज काहीजण हे घरच्या पसंतीने लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. पण, अनेकांनी यापूर्वी प्रेमाच्या बंधनात अडकून आज विवाह बंधनात बांधून घेत एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले आहे. याप्रसंगी बोलतांना दिनेश दवे, रिटा दवे हे पती-पत्नी फार आनंदात दिसून आले. एक वर्षाच्या प्रेमानंतर हे दोघे आज विवाह बंधनात बांधले गेले. रिटाचा आज वाढदिवस सुद्धा आहे. याप्रसंगी बोलताना रिटा म्हणते की, हा दिवस ती आयुष्यात कधीच विसरणार नाही. कारण यापुढे तिला या दिवशी तिच्या पतीकडून ३ गिफ्ट भेटणार आहेत. पहिले गिफ्ट हे बर्थडेच असणार आहे. दुसरे गिफ्ट हे व्हॅलेंटाईन 'डे' चे असणार आहे. तिसरे गिफ्ट हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे असणार असल्याचे ती सांगते. तर तिचा पती दिनेश दवे म्हणतो की, हा दिवस फक्त व्हॅलेंटाईन 'डे' म्हणून नाही तर लग्नाच्या बंधनात बांधले गेल्या कारणाने त्यांच्यासाठी विशेष राहणार आहे.
या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात : वांद्रे पूर्व येथील हनुमान मंदिरातील महंत दिनेशकुमार गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार आज व्हॅलेंटाईन 'डे' म्हणजे प्रेमाचा दिवस असला तरी, प्रेमी युगुलांसाठी हा विशेष दिवस आहे. आज अनेक जोडपी विवाह बंधनात बांधली जातात. फक्त मुंबईतच सांगायचे झाले तर, कमीतकमी ५०० प्रेमी युगुलांची जोडपी विवाह बंधनात बांधली गेली आहेत. प्रेम करणारे अनेक जण लग्न करण्यासाठी आतुरतेने या विशेष दिवसाची वाट पाहत असतात असेही ते म्हणाले.