मुंबई- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यावेळी एकूण 90.66 टक्के एवढा निकाल लागला आहे. राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने हा निकाल तब्बल दीड महिन्यांनी उशीरा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यात कोरोनाचे संकट गडद होण्यापूर्वीच ही परीक्षा संपली होती. तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे हा निकाल तब्बल दीड महिने उशिराने जाहीर झाला आहे.
या परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि कोकण या नऊ विभागातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 13 हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12 लाख 81 हजार 712 उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 90.66 लागला आहे.
बारावीच्या परीक्षेत मुलींनीच यंदाही बाजी मारली असून मुलींचा एकूण निकाल 93.88 टक्के तर मुलांचा 88.04 टक्के इतका लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा 95.89 टक्के इतका लागला असून सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा 88.18 मंडळाचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे.
बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागला असून 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 4.33 टक्के इतके अधिक आहे. त्याच प्रमाणे कला शाखेच्या निकालातही 6.18 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. यंदा 82.63 टक्के इतका निकाल आहे. वाणिज्य शाखेचाही निकाल वाढला असून त्यात 7.14 टक्के इतकी वाढ झाली असून एकूण निकाल हा 86.07 टक्के आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजेच एमसीव्हीचाही निकाल हा 4.78 टक्के इतका वाढला असून यात 90.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.
विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी आणि निकालाची टक्केवारी...
विभाग | विद्यार्थी संख्या | उत्तीर्ण विद्यार्थी |
पुणे | 222646 | 92.50 |
नागपूर | 143772 | 91.65 |
औरंगाबाद | 144379 | 88.18 |
मुंबई | 279931 | 89.35 |
कोल्हापूर | 114469 | 92.42 |
अमरावती | 131434 | 92.09 |
नाशिक | 139346 | 88.87 |
लातूर | 76832 | 89.79 |
कोकण | 28903 | 95.89 |
एकूण | 1281712 | 1281712 |
दुपारी 1 वाजता या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल...
www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com