मुंबई- केंद्रात स्पेशल इकॉनॉमिक झोनचे आयुक्त असताना बलदेव सिंग यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात त्यांची महाराष्ट्र निवडणूक मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती कशी केली. यामागे भाजप आणि निवडणूक आयोगाचे काय साटेलोटे होते, याचा खुलासा केला जावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.
गांधी भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी निवडणूक आयोग आणि भाजपच्या अंतर्गत संबंधांसंदर्भात माहिती समोर यावी म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. मूलभूत आणि गंभीर प्रश्न आम्ही विचारले होते. सोशल मीडियाच्या कंत्राटात भाजपचा संबंध असलेली एक कंपनी सामील होती. याबाबत आयोगाने आम्हाला माहिती मागवतो असे म्हटले होते. परंतु, त्यांनी उत्तर दिले नाही. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असल्याचे सावंत म्हणाले.
केंद्रातही असेच झाले आहे. भाजपच्या अनेक संस्था निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत आहेत. भाजपचा संबंध आयोगाच्या कोणत्या-कोणत्या विषयात आहे. याची माहिती दिली जात नाही. सोशल मीडियाच्या कंत्राटाचे हे प्रकरण हिमनगाचे टोक असल्याचे सावंत म्हणाले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बलदेव सिंग यांची मागील सरकारमध्ये पुन्हा नियुक्ती झाली होती. केंद्रात ते स्पेशल इकॉनॉमिक झोनचे आयुक्त होते. त्यांच्या काळात तिथे गैरव्यवहार झाले होते, अशा तक्रारी आल्या आहेत. यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशीचे आदेशही दिले होते. त्याच प्रकरणात कॅगनेही फेब्रुवारी २०२० मध्ये ताशेरे ओढले आहेत. राज्यात ते निवडणूक अधिकारी म्हणून जुलै २०१९ मध्ये आले आहेत. मात्र, याच अधिकाऱ्यावर सादर सेंट्रल विजीलांसकडून चौकशीचे आदेश दिलेले आहेत. इतक्या महत्त्वाच्या पदावर निवड करताना त्यावेळी सरकारने लक्ष दिले पाहिजे होते की नाही, असा सवाल सावंत यांनी केला.
कॅगचे ताशेरे आल्यानंतर त्याची माहिती केंद्राने का घेतली नाही? २०१८ पासून त्यांच्यावर चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्याची नियुक्ती कशी झाली, असा सवाल करत सावंत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाचा काय संबंध आहे हे आम्ही दाखवून देत आहोत, असे सांगितले.