मुंबई - महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांवर पर्यटन वाढीसाठी हॉटेल आणि मॅरेज हॉल बनवण्यासाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती ऐकताच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेऊन हे धोरण चुकीचे असल्याचे त्यांना त्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हे धोरण मागे घेतले जाईल, असे आश्वासन आपल्याला दिले असल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या धोरणाला माझा आणि शिवभक्तांचा विरोध आहे. गड किल्ल्यांवर अशाप्रकारचे हॉटेल आणि मॅरेज हॉल मी कदापि होऊ देणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी आज मुंबईत दिला आहे. महाराजांचा चरणस्पर्श झालेला प्रत्येक किल्ला पवित्र आहे. गडकिल्ले कोणत्याही वर्गवारीतले असोत त्यांचा इतिहास आहे, आणि तो जपला गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
गडांवर हॉटेल न करता त्यांचे संवर्धन केल तर देशभरातूनच नव्हे, संपुर्ण जगभरातून हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी लोक येतील. यातून स्थानिकांना रोजगार तर मिळेलच पण, त्याचबरोबर समृद्ध वारसा जपण्याचे समाधान सुध्दा मिळेल असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.