मुंबई - कोरोना वाढत्या प्रादुर्भामुळे देशात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, या काळात लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. या बाल पॉर्नोग्राफी विरोधात महाराष्ट्र सरकारने ऑपरेशन 'ब्लॅकफेस' सुरू केले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात येत आहे. आतापर्यंत या ओपरेशन अंतर्गत 135 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबरविभागाचे कौतुक केले.
ते म्हणाले, कारण लॉकडाऊनच्या काळात बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये अथवा चाईल्ड पॉर्नोग्राफी संदर्भात मोठी वाढ झालेली आहे. त्या विरोधात हा विभाग कार्यरत आहे. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींचा मुलगा भुवन रिभू यांच्या इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंड (आयसीपीएफ)ने केलेल्या संशोधनात लोकांचे चाईल्ड पोर्नोग्राफीकडे कल असून याबाबतच्या सर्चच्या मागणीत जोरदार वाढ झाली आहे, असे ताज्या आकडेवारीत निदर्शनास आले आहे. नवी दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, इंदौर यांसह भारतातील शंभर शहरांमधील ट्रेंड मॅप करणार्या 'बाल लैंगिक अत्याचार सामग्री' या नावाच्या अहवालात लॉकडाऊन पूर्वीच्या तुलनेत भारताच्या पॉर्नहबवरील वाहतुकीत 95 टक्के वाढ झाली आहे, असेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
राज्यातील पालकांना आवाहन
लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या मुलांसाठी हा मोठा धोका बनू शकेल. लॉकडाऊन कालावधीत वाढत्या प्रमाणात बाल बलात्कारी, चाईल्ड पॉर्न व्यसनी ऑनलाईन येत आहेत. तर दुसरीकडे या काळात मुले घरबसल्या इंटरनेटचा वापर खेळण्याकरीता, ऑनलाईन मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी करत आहेत. याचा फायदा गुन्हेगार सायबर-ट्रॅफिकिंग, ग्रूमिंग एखाद्या मुलाशी अथवा कधीकधी कुटुंबाशी मैत्री करुन, मुलांचा विश्वास संपादन करून लैंगिक शोषण इत्यादी गोष्टींसाठी करू शकतात. म्हणूनच पालकांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी राज्यातील पालकांना केले.
135 गुन्हे 48 व्यक्तींना अटक
आतापर्यंत चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात 135 गुन्हे नोंद झाले असून 48 व्यक्तींना भा. दं. वि. कलम 292 सह कलम 14,15, पोस्को व 67, 67 (अ), 67 (ब), आय. टी. अॅक्टअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. अकोला, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, परभणी, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, रायगड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, गोंदिया, बीड, भंडारा, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर, लातूर, ठाणे ग्रामीण, अमरावती ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, हिंगोली, नवी मुंबई, धुळे, पालघर, नाशिक ग्रामीण, जालना, वाशिम, सातारा, जळगाव, पुणे ग्रामीण, बुलडाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, ठाणे, सांगली, रत्नागिरी, यवतमाळ आणि लातूर या ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा - नोकरभरती रद्द न करता तरुणांना किमान वेतन द्यावे - आमदार रोहित पवार