मुंबई - पोलिसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत, अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राज्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणाकरिता करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करतानाच पोलिसांच्या वैयक्तिक आशा-आकांक्षा आणि समस्यांची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीला गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्यासह एस. एम. पठाणिया, ओ. पी. बाली, संजीव दयाळ, प्रवीण दीक्षित, सतीश माथूर, पी. एस. पसरिचा, डी. शिवानंद, डी. एन जाधव हे माजी अधिकारी हजर होते.
गणवेशामध्ये हाफ जॅकेटचा समावेश करावा
या बैठकीत राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांनी सुचविले की, पोलिसांच्या शर्ट आणि पँटसाठी एकच कापड वापरले जाते. ते भारतीय वातावरणाशी सुसंगत नसल्याने बदलण्याची गरज आहे. शर्टच्या खिशात मोबाईल, डायरीही बसत नाही. त्यामुळे गणवेशामध्ये हाफ जॅकेटचा समावेश करावा. त्याच्या पाठीमागच्या बाजूला युनिटचे नाव लिहावे. पोलिसांना लेदर बुटामुळे आरोपीचा पाठलाग करणे अवघड होते. त्यामुळे काळ्या रंगाचे स्पोर्टस बूट द्यावेत. गृहमंत्र्यांनी यावर मागणीचा विचार करू असे म्हटले आहे.