मुंबई - सुशांतसिंह प्रकरणावर विरोधकांनी लावून धरलेली बाजू आणि त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. या दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली.
भेटीदरम्यान अनिल देशमुख यांनी सुशांत प्रकरणावर पवारांशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. देशमुख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही आज पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात सुरू असलेल्या अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत राहिली आहे. त्यावर पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी विरोधकांकडून अजित पवार नाराज असल्याची अद्यापही ही चर्चा सुरूच आहे. त्यामुळे आज पवारांसोबत या विषयावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज माझ्या विभागाच्या कामासाठी शरद पवार यांना भेटलो. आज एकाच वेळी आपण आणि खासदार सुनील तटकरे यांनी पवारांची भेट कोणत्या विषयावर झाली, असे विचारले असता मुंडे म्हणाले की, हा योगायोग नव्हता. मात्र, बिहारचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली तो योगायोग आहे, असे ते म्हणाले.
तसेच अजित पवार यांच्या नाराजीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार नाराज नाहीत. तर खासदार सुनील तटकरे यांनीही अजित पवार हे नाराज नाहीत, आणि त्यासाठी काहीही झालेले नसल्याचे सांगितले. दरम्यान, पवार यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही बोलण्यास टाळले. तर सुप्रिया सुळे यांनी कोरोनाबाबत बैठक घेत आहेत, असे सांगितले.