मुंबई- गृह विभागाकडून महाराष्ट्र पोलीस दलातील 45 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत गुन्हे शाखा सहआयुक्त म्हणून मिलिंद भारंबे व कायदा सुव्यवस्थेसाठी सहआयुक्त म्हणून विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या आहेत.
हेही वाचा-राज्यभरात विजेच्या मागणीत वाढ, ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती
राज्य पोलीस खात्यातील आयपीएस विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती करण्यात आली. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांना पाठवण्यात आले आहे.
आयपीएस अधिकारी मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षक, प्रताप दिघावकर यांना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नाशिकचे पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली असून नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपीन कुमार सिंह यांची वर्णी लागली आहे.
अमरावती पोलीस आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरती सिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. आयपीएस रंजित सेठ यांना महासंचालक, लाचलुचपत विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.