मुंबई - भूमिपुत्रांच्या खार, दांडा, जुहू कोळीवाड्यात अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या बॅनर आणि पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भूमिपुत्रांवर जबरदस्तीने लादण्यात येणारे नियम तसेच भूमिपुत्रांना भूमिहीन करणारे, त्यांची संस्कृती व परंपरा नष्ट करणारे विविध प्रकल्प आणि योजनेचे दहन केले. यामध्ये क्लस्टर योजना, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्ग, मेट्रो कारशेड, शासनाच्या विविध कारणांसाठी केलेले जमीन अधिग्रहण, अलिबाग विरार कॉरिडॉर, कोळीवाडा गावठाणात जबरदस्तीने राबवण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना, क्लस्टर योजनावरील सर्व प्रकल्प आणि योजना या सर्व बाबींचा समावेश आहे.
प्रशासनाला व लोक प्रतिनिधींना या सर्व योजना रद्द करण्याची व लोकाभिमुख योजना राबवण्याची सुबुद्धी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.