मुंबई - स्थानिक परंपरेला सादर करणारी हलकी-फुलकी प्रासंगिक विनोदी मालिका 'और भई क्या चल रहा है?' लखनौच्या वैविध्यपूर्ण व संपन्न संस्कृतीला दर्शविते. टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय चेह-यांपैकी एक पवन सिंग मालिकेमध्ये जफर अली मिर्झाची भूमिका साकारत आहे. परंतु गम्मत म्हणजे त्याने ऑडिशन दिली होती ‘मिश्रा’ या व्यक्तिरेखेसाठी आणि तो सध्या साकारतोय ‘मिर्झा’ ची भूमिका. आपल्या या भूमिकेबद्दल सांगताना पवन सिंग म्हणाला, ‘मी जफर अली मिर्झाची भूमिका साकारत आहे, जो लखनवी नवाब आहे. तो, त्याचा कट्टर शत्रू व जिवलग मित्रासोबत, एका हवेलीमध्ये राहत आहे. मिर्झा हा खंबीर आणि वचन पाळणारा असामी आहे. जगासमोर मिर्झा शेर आहे, पण त्याची बेगम येताच मिर्झा मांजर होऊन जातो. तो तिला घाबरत नाही, पण तो तिच्याप्रती असलेल्या अतूट प्रेमामुळे तिचे म्हणणे ऐकतो, असे तो सांगत फिरतो.’
‘ऑडिशन’ संबंधात सांगताना तो म्हणाला, ‘मला ही भूमिका मिळण्याचा प्रवास खूपच रोमांचक आहे. मी सुरूवातीला मिश्राच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. आलो होतो मिश्राची भूमिका साकारायला, पण मिळाली मिर्झाची भूमिका. मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले की मी मिर्झाच्या भूमिकेसाठी योग्य ठरेन, कारण माझा लुक, शरीरयष्टी व दाढी त्या भूमिकेला साजेसे होते. ऑडिशनदरम्यान मला एकामागोमाग एक सरप्राईज मिळत होते. प्रथम भूमिका बदलली आणि त्यानंतर भाषा. दिल्लीचा असल्यामुळे माझी भाषाशैली व उच्चार लखनवी भाषेपेक्षा वेगळे आहेत. मला भाषेच्या सफाईदारपणावर काम करावे लागले. पण समस्या फक्त येथेच थांबल्या नाहीत, या सुसंस्कृत भाषेला विनोदाची झालर लावण्याचे देखील आव्हान होते. अथक मेहनत व सयंमानंतर माझा विश्वास आहे की मी नवाबाप्रमाणे भाषा बोलण्याच्या कलेमध्ये निपुण झालो आहे आणि त्यामध्ये विनोद देखील पेरत आहे.’
मालिकेत मिर्झाचे चहाचे दुकान आहे आणि एकंदरीतच ‘चहा’ प्रकरणावर पवन म्हणाला, ‘दिल्लीचा चहा माझ्या नसानसांमध्ये सामावलेला आहे. अर्थातच, मला चहा प्यायला आवडतो. चहा ही पाककृती कोणत्याही डिशची परिपूर्ण सोबती आहे. ती जुळवून घेणा-या जोडीदारासारखी आहे, अगदी मिर्झा सकिनाला सांभाळून घेतो तशी. चहा तुम्हाला स्फूर्ती देणारे पेय आहे, जे कधीच चुकीचे ठरू शकत नाही. चहा जितका गोड, तितकाच जीवनात गोडवा वाढत जातो.’
भारतातल्या निमशहरी भागात चहाचे दुकान हे ‘हँग आऊट’ करण्याचे स्थानिकांचे एकमेव ठिकाण. त्याबाबत बोलताना पवन म्हणाला, ‘क्रिकेट सामना सुरू असेल तर चहाच्या दुकानावर खूपच चर्चा रंगलेल्या असतात. सचिन तेंडुलकरला जे स्वतःबद्दल माहित नसते ते त्यांना माहित असते. क्रिकेट, राजकारणापासून सुरू झालेली चर्चा पत्नीच्या मक्तेदारीपर्यंत येऊन संपते. कमी बोलणारी व्यक्ती देखील या चर्चेमध्ये सामील होत असते. तेथील चर्चा करणारे सर्वज्ञ असतात परंतु येथे कधीच कोणाला कंटाळा येत नाही.’
मालिकेत मिर्झा त्याच्या पत्नीला वचकून आहे. प्रत्यक्षात पवन आणि त्याच्या पत्नीसोबत असलेला नात्याबद्दल सांगताना तो म्हणाला, ‘मी मिर्झाच्या भूमिकेमध्ये सहजपणे सामावून जाण्यामागील कारण म्हणजे मी वास्तविक जीवनामध्ये त्याच्यासारखाच आहे. मिर्झा आणि माझ्यामध्ये बरेच साम्य आहे. आम्ही मिळणा-या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो, आमच्या पत्नी नेहमीच केंद्रस्थानी असतात आणि आम्हा दोघांना चहा प्यायला आवडतो. तो ज्या पद्धतीने त्याच्या पत्नीला नाही म्हणू शकत नाही, तसेच वास्तविक जीवनात मी पण. मला आठवते, लॉकडाऊनदरम्यान मी एकदा भांडी घासली होती आणि माझ्या पत्नीने मी ते काम सतत करत राहीन याची खबरदारी घेतली होती. ती शपथेवर सांगते की ती मी घासलेल्या भांड्यांमध्ये पाहून कुंकू लावू शकते, आरश्याविना. एकतर ती गोड बोलून काम करून घेत असेल किंवा मी चांगला भांडी घासणारा असेन.’
पवन कुमार हाडाचा कलाकार आहे. तो म्हणतो की, ‘माझ्यामधील कलाकाराला आव्हान करणारी कोणतीही भूमिका मला साकारायला आवडेल. पण मी विनोदी भूमिकांना प्राधान्य देतो, कारण अशा भूमिका कठीण असतात परंतु भरपूर समाधान देऊन जातात. तसेच संधी मिळाली तर मला नकारात्मक भूमिकादेखील साकारायला आवडेल.’ एण्ड टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘और भई क्या चल रहा है?' मालिकेत पवन कुमार सोबत इतर कलाकार आहेत, शांती मिश्राच्या भूमिकेत फरहाना फतेमा, सकिना मिर्झाच्या भूमिकेत आकांक्षा शर्मा आणि रमेश प्रसाद मिश्राच्या भूमिकेत अंबरिश बॉबी आहे.