मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक ( former minister Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी ( urgent hearing held in Bombay High Court ) घेण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांच्यावतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर केली होती. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 6 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक नववर्ष आणि नाताळ कारागृहातच साजरा करावा लागणार आहे.
ताताडीने सुनावणी देण्यास नकार : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. 30 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यांनी प्रकृती अस्वस्थाचा दाखला देत उच्च न्यायालयाकडे ताताडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र यावर आज मंगळवारी उच्च न्यायालयाकडे ताताडीने सुनावणी देण्यास नकार दिला. परंतु मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. तसेच वैद्यकीय गरज भासल्यास सुट्टीकालीन न्यायालयाकडे ही दाद मागण्याची मलिक यांना मुभा आहे.
हसीना पारकरच्या मुलाच्या जबाबामुळे अडकले नवाब मलिक : दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर हा मुंबईत राहतो. गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.
काय म्हणाला अलीशाह पारकर ? माझी आई दिवंगत हसीना पारकर ही गृहिणी होती. उदरनिर्वाहासाठी ती छोटे मोठे आर्थिक व्यवहार करत होती. तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला भाडे मिळत असे. साधारण ३ ते ५ लाख रूपये भाडे तिला मिळत होतं. माझी आई (हसीना पारकर) रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची. दाऊदची बहीण अशीही तिची ओळख होती. त्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही ती मिटवत होती.
आजी अमीना बी कासकर यांच्या नावावर या मालमत्ता होत्या : दाऊद इब्राहिम (मामा) आणि माझी आई (हसीना पारकर) यांच्यातले संबंध हे चांगले होते. ते वारंवार एकमेकांशी फोनवरून बोलत होते. माझी आई तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद आणि हसीना पारकर हे आर्थिक व्यवहार करत होते. माझ्याकडे फारसा तपशील नाही मात्र मला हे माहित आहे की माझी आई हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेवर लक्ष ठेवत होती. माझी आजी अमीना बी कासकर यांच्या नावावर या मालमत्ता होत्या. SAFEMA, NDPSA मुंबई २००८ मध्ये संलग्न केले होते. त्यानंतर इकबाल कासकर (माझे काका) यांनी दाऊद इब्राहिम म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेचा ताबा घेतला आणि त्यांची देखभाल सुरू केली.
हसीना पारकर 'हे' दोन प्रमुख सहकारी : माझ्या आईचे (हसीना पारकर) दोन प्रमुख सहकारी होते. एक होता सलीम पटेल, दुसरा होता खालिद जो गाडी चालवत होता. शमीन म्हणून एकजण होता तो देखील माझ्या आईसाठी काम करत होता. सलीम पटेल हा कांद्याची खरेदी विक्री करत होता आणि मालमत्तेच्या व्यवहारातही होता. माझी आई हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंगचा वाद मिळवला होता. तिथे ऑफिस सुरू करण्यात आले आणि कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला गेला होता.
ईडीला नवाब मलिक यांच्या विरोधात मोठा पुरावा : माझ्या आईच्यावतीने या मालमत्तेशी संबंधित वाद काय होता ते माहित नाही. मात्र सलीम पटेल त्या ऑफिसमध्ये बसून कामकाज पाहात असे. त्यानंतर माझी आई हसीना पारकरने तिच्या ताब्यात असलेला भाग नवाब मलिक यांना विकला होता. नवाब मलिक यांनी माझी आणि सलीम पटेल यांना नेमका किती मोबदला दिला ते मला माहित नाही असंही अलीशाह याने सांगितले. मात्र नेमके हेच वक्तव्य ईडीला नवाब मलिक यांच्या विरोधात मोठा पुरावा मिळाला. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली.
नवाब मलिक यांच्यावर आरोप काय? हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही. त्यामुळं आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच 'ईडी'ने कारवाई करत मलिक यांना अटक केली होती. मलिक यांनी याआधीही अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा प्रत्येक अर्ज फेटाळण्यात आला आहे. मलिक सुरुवातीला आर्थर रोड कारागृहात होते. मात्र त्यांना मृतपिंडाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत.