मुंबई : भाजपचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर महिलेने लावलेल्या बलात्कारातील आरोपावर ( Ganesh Naik Rape Accused ) ट्रायल कोर्टाला तीन महिन्यात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाला ( Order To Settle Case In Three Month ) दिले. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात देखील गणेश नाईक यांच्या विरोधात कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ए समरी अहवाल सादर केल्याचे नवी मुंबई पोलिसांनी आज उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) सांगितले. त्यामुळे गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल : भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक बलात्काराचा आणि दुसरा शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणात जुलै तर दुसऱ्या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात ए समरी अहवाल सादर करण्यात आल्याचे सहायक सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.
दोन्ही प्रकरणांना राजकीय किनार : त्यावर नाईक यांच्याविरोधातील दोन्ही प्रकरणांना राजकीय किनार आहे. तसेच कोणत्याही राजकीय व्यक्तिविरोधात दाखल गुन्हे विनाकारण प्रलंबित ठेवले जातात. नाईक यांच्याविरोधातील दोन्ही गुन्ह्यांत पोलिसांनी ए समरी अहवाल सादर केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही प्रकरणात नाईक यांना नोटीस बजावली आहे. परंतु त्यानंतर काहीच झालेले नाही असे नाईक यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच कनिष्ठ न्यायालयाला दोन्ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली. ती मान्य करून दोन्ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाला दिले. तसेच नाईक यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली.
काय आहे प्रकरण : 42 वर्षांच्या तक्रारदार महिलेने केलेल्या दाव्यानुसार नाईक यांच्याशी तिची 1993 मध्ये भेट झाली होती. नाईक यांच्याशी तिचे 1995 पासून संबंध होते आणि त्यांच्यासह ती लिव्ह-इनमध्ये राहत होती. त्यांना एक मुलगाही आहे. नंतर नाईक हे आपल्याला चांगली वागणूक देत नव्हते. त्यांनी आपले फोन घेणेही टाळले. आमच्यात सतत भांडणे होत होती. नाईक यांनी एकदा आपल्याला दुपारच्या जेवणासाठी कार्यालयात बोलावले. तिथे वाद झाल्यावर नाईक यांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि आपल्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला.